Header Ads Widget

गाव या व्यवस्थेची दुसरी काळी बाजू...!



गाव लांबून पाहिलं की ते नितळ, शांत आणि आपुलकीचं वाटतं. पण प्रत्यक्ष गावात राहून काही करायचं ठरवलं, की लगेच लक्षात येतं—गाव ही केवळ भौगोलिक जागा नाही, ती वादांची, अहंकाराची आणि दहशतीची एक व्यवस्थित चालणारी व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विकासापेक्षा वादच जास्त असतात.

गावात सर्वात जास्त कटू वाद हे भावकीतच आढळतात. जमीन वाटप, वारसा, शेतीची उत्पन्नवाटणी किंवा पूर्वजांनी केलेल्या अन्यायाच्या आठवणी—या सगळ्यांवर भावंडं, चुलत भाऊ, काका-पुतणे एकमेकांचे कट्टर शत्रू बनतात. इथे वाद व्यक्तीशी नसतो; तो पिढ्यानपिढ्यांचा वारसा असतो. एकदा मनात राग भरला की समेट म्हणजे अपमान, आणि माफी म्हणजे कमजोरी असं मानलं जातं. परिणामी न्यायालय, पोलीस, राजकारण—सगळं भावकीच्या सूडाचं साधन बनतं.यातून जी कटुता निर्माण होते ती सगळ्या येणाऱ्या पिढ्या नासवते.

शेतीतली वाट ही गावात केवळ रस्ता नसते; ती सत्तेची आणि वर्चस्वाची द्योतक असते. बैलगाडीची वाट, ट्रॅक्टरचा रस्ता, पाण्याचा निचरा—यावरून भांडणं इतकी वाढतात की शेवटी हिंसाचारापर्यंत जातात. दोन फूट जमिनीवरून कोर्टात पंधरा वर्षे केस चालते, पण सामंजस्य होत नाही. कारण प्रश्न जमिनीचा नसतो, तर कोण वरचढ याचा असतो.आपल्यामुळे एखादा अडतोय हा अहंकार अनेक भिकारवृत्तीच्या गावकऱ्यांना आयुष्यभर जगण्यासाठी पुरेसा असतो.त्याच अहंकाराला कुरवाळत तो माणूस अशाच जिरवाजिरवीच्या धंद्यात अडकून पडतो. शिक्षण, सामाजिक विकास, आर्थिक प्रगती हे विषय अनेकांसाठी गौन असतात.काड्या करणे, वाद लावणे, शह देणे, मुस्कटदाबी करणे आणि मनगटबळाचा वापर करून धास्ती बसवणे यात अनेक गावकऱ्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.अशी अनेक गावे आपल्या महाराष्ट्रात आहेत जिथं आठवड्याला एक पोलीस केस होतच असते.आणि अशी गावे तालुक्यात, जिल्ह्यात यासाठीच प्रसिद्ध असतात.

गावात रस्ता कुठे जावा, कोणाच्या शेतातून जावा, कोणाच्या घरासमोरून जावा—हे प्रश्न तांत्रिक नसून सामाजिक आणि जातीय असतात. रस्ता आला तर किंमत वाढेल, सत्ता वाढेल, आवाज वाढेल—म्हणूनच अनेकदा रस्त्यांना विरोध होतो. “आमच्या शेतातून नाही”, “आमच्या वस्तीतून नाही”—ही वाक्ये विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला अडवतात. रस्ता म्हणजे सुविधा नसून, गावात तो दबदबा ठरवणारा घटक बनतो.

गावपातळीवरची निवडणूक ही लोकशाही प्रक्रिया कमी आणि व्यक्तिगत युद्ध जास्त असते. ग्रामपंचायत, सहकारी संस्था, सोसायटी—इथे मत म्हणजे विचार नसतो, तो भावकी, जात आणि सूडाचा विस्तार असतो. निवडणुकीनंतर गाव दोन गटांत विभागलं जातं. विरोधी गटाला कामं मिळत नाहीत, योजना रोखल्या जातात, सामाजिक बहिष्कार टाकला जातो. लोकशाहीच्या नावाखाली गावात दहशत निर्माण होते.तुम्हाला आज मराठा संघटना, ओबीसी संघटना, दलीत संघटना किंवा इतर ज्या ज्या जातीय संघटना आहेत त्या शहरात मोर्चे काढून त्यांच्या हक्कासाठी लढताना एकजूट दिसत असतील पण गावपातळीवर यांच्यात हजारो वाद असतात.हिंसक घटना घडलेल्या असतात. 

एकाच जातीचे लोक गावात असले तरी गावात यांचे वेगवेगळे गटतट असतात.हे फक्त वरून आणि बाहेरून एकजूट दिसतात.प्रत्यक्षात त्यांच्यात लाखो लफडे आणि हजारो अंतर्विरोध असतात ज्यातून ते कधीच बाहेर पडून एकमेकांना सहकार्य करत नाहीत.त्यामुळे विकासाच्या कितीही योजना सरकारने आणल्या तरी त्या राबवण्यासाठी जोपर्यंत पोलादी व्यवस्था नसेल तोपर्यंत हे गटतट अशा योजनांना लोकांपर्यंत पोहचूच देत नाहीत.

गावात प्रगती करणारा माणूस हा प्रेरणा ठरत नाही; तो धोका ठरतो. कोणी शिकला, नोकरीला लागला, व्यवसाय वाढवला, समाजकार्य केलं—की लगेच त्याच्याविरोधात कुजबुज सुरू होते. बदनामी, आरोप, संशय यांचा पाऊस पडतो. “आपल्यापेक्षा कुणी पुढे जाऊ नये” ही भावना इतकी खोलवर आहे की गाव स्वतःचीच प्रगती अडवते.मत्सर, द्वेष या रोगांची लागण झाल्याने गावच्या गावं बरबाद झाली आहेत.त्यामुळे प्रगतीवर बोलणारा किंवा प्रगती करणारा माणूस हा गावातल्या अनेकांचा दुश्मन असतो.तो जितकी प्रगती करतो तितके त्याचे दुश्मन वाढायला लागतात.तो अनेकांच्या डोळ्यात सलायला लागतो.गावातील माणूसकीच्या दंतकथा ह्या व्यक्तिगत आहेत त्या सामूहिक नाहीत.गावातील माणूसकी हि एकमेकांच्या संबंधावर अवलंबून आहे; तो प्रत्येकाचा आत्मगूण नाही.

गावात दहशत म्हणजे नेहमी तलवार किंवा बंदूक यांच्या जोरावरची नसते. ती बहुतेक वेळा सामाजिक दबावाच्या स्वरूपात असते. बोलू नकोस, विरोध करू नकोस, तक्रार करू नकोस—नाहीतर परिणाम भोग. पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था कागदावर असते; प्रत्यक्षात गावातील “सत्ता केंद्रे”च निर्णय घेतात. त्यामुळे सामान्य माणूस गप्प राहणंच सुरक्षित मानतो. जितकं एखादा माणूस राष्ट्रिय पातळीवरच्या गोष्टींवर, राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर बोलू शकतो तितकं तो गावकीवर बोलू शकत नाही. टीका तर लांबची गोष्ट आहे तो चांगल्या चार सूचना करू शकत नाही.लगेच त्याला "आला मोठा दिड शहाणा" म्हणून निकाली काढले जाते.

गावांत जळकुटेपणा शहाणपण समजला जातो,जातीय अभिमान संस्कृती मानली जाते,आणि मागास विचार परंपरा ठरतात.प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावलेच पाहिजे हा गावचा नियम आहे.त्यातून दुसऱ्याची खिल्ली उडवणे, अपमान करणे ,दुसऱ्याला खाली मान घालायला लावणे आणि स्वतःचे श्रेष्ठत्व दुसऱ्यांवर लादण्याचे प्रकार गावच्या अनेक बैठकांत, चावड्यांवर आणि समारंभात ठळकपणे दिसतात.

गाव व्यवस्थेत सर्वात वाईट अवस्था महिला या घटकाची आहे. व्यक्तिस्वातंत्र्य नावाची गोष्ट महिलांना अजूनतरी शिवलेली नाही.चूल आणि मूल हा प्रकार अजूनही चालूच आहे.घरातीलच कोंदट वातावरणात त्यांना श्वास घ्यावा लागतो.समता किंवा समानता वगैरे घरात कधीच नसते.या महिला प्रामुख्याने शेतीची कामेही करतात.पण त्यांना शेतीतले निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. जितक्या मोठ्या घरची महिला तितकी ती बंदिस्त असते. शिक्षणाने बाहेर पडणाऱ्या मुली या कोंडवाड्यातून बाहेर पडल्या आहेत पण त्यांच्या आया अजूनही तिथेच आहेत जिथे त्या लग्नानंतर आल्या होत्या.सगळ्याच घरांची हि स्थिती नसली तरी बहुतांश घरात अशीच परिस्थिती आहे.घरातील व्यसनाधीनतेचे सर्वाधिक चटके महिलांना सहन करावे लागतात.

अपंगांना गावाकडे आंधळं, लंगडं आणि पांगळं या नावाने उद्धारित केलं जातं. चिडवाचिडवीचे प्रकार मजा घेण्यासाठी सर्रास चालतात.जे प्रत्युत्तर देऊ शकत नाही त्यांना अशा हेटाळणीला सामोरे जावे लागते.प्रत्येकाला लेबल लावण्यात गावकऱ्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.

गाव वाईट नाही, पण गाव एक बंदिस्त व्यवस्था आहे.या व्यवस्थेला आधुनिकतेचा वारा फक्त पेहराव बदलण्यात लागला आहे.आतून असलेले विचार अजूनही मध्ययुगीनच आहेत.जोपर्यंत विचार बदलत नाहीत,तोपर्यंत गावं बदलणे अशक्य आहे.अजूनही अस्पृश्यता गावात जिवंत आहे.अजूनही जातीवाद गावांमध्ये टोकाचा आहे.अजूनही गावांत निवडणूकीत मुडदे पाडले जातात.वर्चस्वाच्या हिंसक लढाया लढल्या जातात.

गावं रिकामी होण्याचे मुख्य कारण गावांत रोजगार उपलब्ध नाही हे असले तरी लोकांनी गावं सोडण्याची सामजिक कारणेही तितकीच प्रबळ आहेत. महिलांनी याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे.शहरात चांगले शिक्षण आणि त्यातून कुटुंबाची प्रगती हा एक प्रमुख घटक आता यास जबाबदार ठरतोय.

म्हणूनच गावगाड्याचे वास्तव हे आहे की—
गाव बाहेरून सुंदर दिसतं,
पण गावात राहून माणूस राहणं
आजही सोपं नाही....!

© रविकुमार सुभाषराव.

Post a Comment

0 Comments