*श्रध्देच्या नावाखाली अंधश्रध्दा पसरविणारा गोरखधंधा नाशिक सारख्या पुण्यनगरीत आणि पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे सुरु आहे. पुजा हा मनशांती देणारा एक भाग असला तरी त्यात होणारी लुट ही श्रध्देला धक्का पोहचविणारी आहे.*
पुरातन काळापासून आपल्या देशात ऋषी परंम्परा, गुरु परम्परेला अनन्य साधारण महत्व आहे. राजदरबारात सुध्दा पुरोहितांचे किंवा गुरुचे स्थान मानाचे असायचे. गुरुंचा आशिर्वाद हा पूर्ण उर्जेने भरलेला असल्याने त्याचा परिणाम हा सकारात्मक असायचा. विजयी भवः म्हटले किंवा कल्याण भवः म्हटले तरी त्या शब्दामधील शक्ति काम करायची. गुरु आश्रमात वेदांचे, ब्रम्हचर्याचे, युध्दकलांचे शिक्षण दिले जायचे. आणि त्यांत निपूण झाल्यानंतर शिष्यांना घरी जाण्यास परवानगी मिळायची. या काळात विद्याध्येयनासोबत आश्रम नियमांचे पालन करणे, फळे जमा करणे, लाकडे आणणे,पाणी भरणे गुरुंची सेवा करणे अशा प्रकारचे संस्कार गुरु किंवा पुरोहितांच्या माध्यमातुन केले जात असत. राज्यात शांती निर्माण व्हावी, पाऊस चांगला पडावा, रोगराई नष्ट व्हावी, राज्यात सुख-शांती नांदावी म्हणून मोठ-मोठे यज्ञ केले जात असत. या परम्परेतुनच जी गुरु पंरमपरा किंवा पुरोहितांची मान - सन्मानाची परंमपरा निर्माण झाली ती आजतागायत सुरु आहे. एखाद्या गोष्टीसाठी पुरोहिताच्या माध्यमातुनच मुहुर्त काढले जायचे. राजाच्या राजपूत्राचे किंवा कन्येचे लग्न असो पुरोहितांच्या सल्ला राजा घेत असे. यज्ञकार्य, दानधर्म पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली चालायचे. म्हणून साधुसंत, गुरु, पुरोहित, ऋषी-मुनी यांना भारतीय हिंदु संस्कृतीत मान सन्मान आहे. दक्षिणा देणे, त्यांचे आशिर्वाद घेणे या मनशांती देण्यार्या बाबी कालातरांने 21 व्या शतकात आजही सुरु आहेत. संताची एक मोठी परम्परा या देशाला आणि महाराष्ट्राला आहे. शिवाजी महाराज, राणाप्रताप यांच्या दरबारात पुरोहितांचे स्थान अनन्य साधारण होते. अर्थात संख्याशास्त्र,वेदशास्त्र, ग्रह तार्यांचे शास्त्र, कुंडलीनी शास्त्र, शुभ शकुन हे कालमापनाच्या शास्त्रानूसार घडणार्या घटनाक्रमांचे संकेत दर्शवितात म्हणून अमंगळातून मंगळ होण्यासाठी सामान्य माणूस देखील पुजाअर्चा,दान धर्म, होम हवन करत असतो. त्यासाठी पुरोहितांची मानसन्मानाची परम्परा या राज्यात आजही सुरू आहे. परंतू अलिकडच्या काळात मोठ मोठया संताचे कारनामे, त्यांना झालेली शिक्षा, संताच्या आत्महत्या मनाला वेदना देणार्या तर आहेतच, पंरतू सामान्य संसारी माणसाच्या श्रध्देला धक्का पोहचविणार्या देखील आहेत. कारण कितीही, बुध्दीमान माणूस असला शास्त्रज्ञ असला,मोठा आयएएस, आयपीएस अधिकारी असला तरी शेवटी तो एक माणूस असतो. आणि त्यांची कुठेतरी कुणावर तरी श्रध्दा देखील असते. गृहकलह असेल, आरोग्याचा वारवांर उद्भावणारा प्रश्न असेल, किंवा एखाद्या कुटुंबात वांरवार अपघातांची घटना घडत असेल, आर्थिक संकटे येत असतील अशावेळी कुठेतरी सुखशांती निर्माण व्हावी यासाठी पुजा, यज्ञ करुन मनाला समाधान देणार्या बाबी केल्या जातात. ज्यामध्ये अलिकडच्या काळात कालसर्प,त्रिपींडी, नारायण नागबळी करण्यासाठी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर पंचवटी घाटावर देशभरातून भाविक येत असतात. आणि त्या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण करुन ठाण मांडून बसलेल्या आणि भाविकांची लुट करणारे पुरोहित खर्या अर्थाने पुरोहित आहे की गुंड आहेत ? याची प्रचिती येते. विशेष म्हणजे या ठिकाणी आपली सत्ता निर्माण केलेल्या पुरोहितांमध्ये महाराष्ट्रातील भिक्षुकी मागुन आपला पौराहित्य व्यवसाय करणार्या मराठी ब्राम्हणांचा सहभाग नाही. या ठिकाणी जे पुरोहित आहेत त्यामध्ये त्रिवेदी,त्रिपाठी, तिवारी,पांडे या आडनावाचे परप्रांतातील गुंडाचा मोठया प्रमाणावर बोलबाला आहे. आपल्या घरी नेहमी येणार्या पुरोहित आपण त्या ठिकाणी पुजा-अर्चा, धार्मिक कामासांठी नेऊ शकत नाही. कारण त्यांना या घाटावर परवानगीच दिली जात नाही. असे असले तरी ज्यांनी आपला ‘बुध्दीप्रामाण्यवाद’ गहाण ठेवला असेल त्यांनीच अशा पुजा कराव्यात, असा आमच्या समाजवादी मित्राचा सल्ला आहे. कारण हा भाग भावनेशी श्रध्देशी असलल्याने तो बंदच करावा असा सल्ला आम्ही देणार नाही. परंतु तलवारी,गावठी कट्टे, प्राणघातक शस्त्रे, काडतुसे कोयते, चाकू, हॉकी स्टीक या पुरोहितांकडे कायम असतात. मद्यपान, भांग, गांजा, यांचे सेवन करुन या पुजाविधी केल्या जातात. आपल्या पूर्वजाना,पितरांना त्या कितपत लागू पडतील हा संशोधनाचा भाग आहे. परंतू नाशिकच्या त्र्यंबकेश्वर घाटावर वर्षानुवर्षापासून सुरू असलेली ही या पुरोहितांची गुंडगिरी पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना कधी थांबवणार असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जातो आहे. याठिाकणी व्यवस्थापन गुंडाचे कि पुरोहितांचे असा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक पोलीस यंत्रणेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षकांना या घाटावर सुुरु असलेला धार्मिक उत्माद थांबविण्यासाठी तपास यत्रंणेला आदेश देण्याची आवश्यकता आहे. नाशिक शहरातील सामाजिक संघटनांनी सुध्दा कपाळावर टीळा लावून भाविकांची होणारी आर्थिक लुट आणि मानसिक शोषण थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कालसर्प शांती विधीवरुन पुरोहितांमध्ये नाशिक शहरात झालेली शसस्त्र हाणामारी ही महाराष्ट्राच्या परंम्परेला शोभणारी नाही. कालसर्प, नारायण नागबलीने मनशांती मिळविणार्या भाविकांनी अनाथ आश्रमात,दिव्यांग शाळांमध्ये, अंध शाळांमध्ये जावून अन्नदान, वस्त्रदान, मिठाई, वाटुन मिळणारा आनंद अनुभव करुन पहावा. आपल्याला मनशांतीसोबत प्रंचड आनंद मिळेल यांची हमी आम्ही देत आहोत. करुन पहा. एव्हढेच.
*दैनिक पोलीस शोध*साभार
0 Comments