मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक, बीड जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावानं देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण असा भरगच्च कार्यक्रम रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी बीड जिल्हयातील देवडी येथील माणिकबागेत होत आहे.. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, न्यूज 18 लोकमतचे प्रसिध्द अँकर विशाल परदेशी, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे अशी माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली..
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात दर तीन महिन्यांना परिषदेची बैठक होते.. यावेळेस प्रथमच बीड जिल्हयातील एका खेड्यात ही बैठक होत असल्यानं राज्यभर बैठकीची चर्चा आहे..
बैठकीला जोडूनच बीड जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्या पत्रकारांचे योगदान राहिले आहे अशा पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे..
दिव्यांगांना न्याय मिळवून देणारे दीपक कैतके आणि मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे तसेच बीड जिल्हयातील आदर्श शेतकरी कल्याणराव कुलकर्णी या बीड जिल्ह्याच्या सुपूत्रांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे..
माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने समाजसेवा, पत्रकारिता आणि कृषी क्षेत्रात योगदान देणारया तीन मान्यवरांचा सन्मान पद्मश्री पोपटराव पवार, मंगेश चिवटे, विशाल परदेशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
किसानपुत्र चळवळीच्या माध्यमातून शेतकरयांना न्याय मिळवून देणारे आणि आयुष्यभर चळवळीसाठी मोठे योगदान देणारे अमर हबीब, अगोदर दैनिक मराठवाडा आणि नंतर माजलगाव समाचारच्या माध्यमातून आदर्श पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार सुहास देशमुख आणि अनेक अडचणींवर मात करून शेतीत नवनवे प्रयोग करणारे देवडी येथील आदर्श शेतकरी गोरख झाटे यांना
अनुक्रमे समाजभूषण, पत्रभूषण आणि कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे..
सकाळी 11 ते 1 पर्यत पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि दुपारी 2 वाजता परिषदेची परिषदेची बैठक होईल अशी माहिती परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे.. कार्यक्रमाची जोरदार तयारी टीम बीड आणि टीम वडवणी करीत आहे..
पुरस्कार वितरण सोहळयास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, विभागीय सचिव रवी उबाळे, जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, विभागीय संघटक सुभाष चौरे, वडवणी तालुका अध्यक्ष सतीश सोनवणे आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शोभना देशमुख यांनी केले आहे..
0 Comments