महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे बाजूला नदी वाहात आहे, पण पाण्याच्या नियोजनाअभावी मोठा दुष्काळ सहन करावा लागत आहे अशी परिस्थिती धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर या तालुक्याची कधीकाळी होती. पण आज शिरपूर सुजलाम सुफलाम आहे. कधीकाळी रोजगारासाठी बाहेर गेलेले लोक परत आले आहेत. शिरपूरचा चेहरा बदलणारा पॅटर्न संपूर्ण राज्यात शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो.
सुरेश खानापूरकर महाराष्ट्र शासनात भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर आरामाचे आयुष्य जगण्याऐवजी त्यांनी आपल्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा योग्य उपयोग करण्याचे ठरवले. शिरपूर भागात २००४ साली त्यांनी काम सुरू केले. जमिनीचा सूक्ष्म अभ्यास करून काम सुरू करण्यात आले. योग्य त्या ठिकाणी नाल्यांची खोली वाढवत, रुंदीकरण करून जलसंचय वाढविण्यात आला.
वाहून जाणारे पाणी जुन्या विहिरींमध्ये सोडण्यात आले. हा विचार अनेकांना नवा होता. हळूहळू करत एकेक गोष्टींवर काम करण्यात आले आणि कधीकाळी ७००-८०० फूट खोल असलेली पाणीपातळी चक्क ८०-९० फुटांवर आली. हा चमत्कार घडून आला. याला खानापूरकर जमिनीची अँजिओप्लास्टी करणे असे म्हणतात. म्हणजेच भूगर्भात जाण्यासाठी पाण्याला बायपास मिळवून देणे.
शिरपूर तालुक्यात जलसंधारणाच्या कामांतर्गत विविध नाल्यांमध्ये अनेक बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे सुमारे ४० फूट खोल, २० ते ३० फूट रुंद होते. दोन बंधाऱ्यांदरम्यान ५०० मीटरचे अंतर ठेवण्यात आले. एक बंधारा भरला की मग दुसऱ्या बंधाऱ्यात पाणी जाते. यामुळे पाणी जमिनीत जिरते. यामुळे विहिरींना आणि इतर जलसिंचनाच्या साधनांना तुफान पाणी मिळू लागले.
शिरपुर तालुक्यात उभे करण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे तापी नदीतून अरबी समुद्रात जाणारे पाणी रोखण्यात आले. याचा थेट फायदा तालुक्याला झाला. शिरपूर तालुक्यात राबवण्यात आलेला हा पॅटर्न किती यशस्वी आहे हे यावरून कळेल की महाराष्ट्र सरकारने २०१३ साली संपुर्ण महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्न राबविण्यासाठी जीआर काढला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये शिरपूर पॅटर्न राबविण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले गेले होते.
खानापूरकर हे तसे मूळ खान्देशी व्यक्तिमत्त्व. जळगाव जिल्ह्यातील खानापूर हे त्यांचे गाव. अगदी लहान वयात त्यांना भूविज्ञान क्षेत्रात आवड निर्माण झाली होती. भूविज्ञान याच विषयात त्यांनी एमएस्सी पूर्ण करत महाराष्ट्र शासनात नोकरी सुरू केली. नोकरीच्या काळात त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी काम केले. या काळात त्यांनी केलेल्या कामातून आणि अभ्यासातून त्यांना दिसणाऱ्या अडचणींवर त्यांनी शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून काम केले.
शिरपूर पॅटर्नचा परिणाम असा झाला की एका पिकाचे उत्पन्न कसेबसे निघत असताना वर्षभरात शेतकरी अनेक पिके घेऊ लागले. खानापूरकर यांना या कामी मोठी साथ मिळाली ती शिरपूरचे आमदार अमरीश पटेल यांची. एक लोकप्रतिनिधी आणि एखाद्या विषयाला वाहून घेतलेला तज्ञ जेव्हा एकत्र येऊन एखादे काम हाती घेतात तेव्हा काय होऊ शकणारा बदल किती मोठा असतो हे शिरपूर पॅटर्नने सिद्ध केले आहे.
उदय पाटील.

0 Comments