Header Ads Widget

शिरपूर : वाळूमाफियांनी फोडली नायब तहसीलदारांची कार



शिरपूर (जि. धुळे) : अवैध वाळू वाहतुकीवर (Illegal sand transportation) कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांची (Deputy Tehsildar) खासगी कार दगडफेक करून फोडल्याची घटना बुधवारी (ता.१२) दुपारी साडेचारला हिंगोणी (ता. शिरपूर) येथे घडली.

येथील तहसील कार्यालयात कार्यरत निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर बुधवारी धुळे येथे गेले होते. तेथून परत येताना गिधाडे व बाळदे येथील तलाठ्यांकडे दप्तर पाहावयाचे असल्याने ते सावळदे येथून गिधाडे गावाकडे वळले. शिरपूरकडे येताना, हिंगोणी शिवारात वाळू तस्करीचा प्रकार नजरेस पडल्याने ते कार (एमएच ३९, एबी ८५८०) उभी करून गेले. त्याच वेळी संशयितांनी कारवर तुफान दगडफेक केली. त्यात कारच्या काचा फुटल्या. याबाबत माहिती मिळताच उपसरपंच मिलिंद पाटील तेथे पोचले. त्यांनी पेंढारकर यांना धीर दिला. श्री. पेंढारकर यांनी घडलेला प्रकार कळविल्यानंतर तहसीलदार आबा महाजन घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुखही पोचले. संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. संशयित निष्पन्न झाला असून, वाळू वाहतुकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments