मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवम हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गांजा विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे, पोलिस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, ताराचंद सोनावने यांच्या पथकाने सापळा रचून देवकर याला गांजा विक्री करताना अटक केली.
त्याच्याकडून 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा 20 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, धुळे येथून त्याने गांजा खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांचे पथक धुळे येथे रवाना झाले. तेथून पोलिसांनी रेहमल पावरा व संदीप पावरा यांना अटक केली. त्यांनी हा माल दिनेश पावरा याच्याकडून खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस दिनेशचा शोध घेत आहेत. अटक आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिरपूर तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या गावातील जंगलात आदिवासी लोक गांजाचे उत्पादन घेत असून तेथून ते चोरट्या मार्गाने शहरी भागात त्याची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हा गांजा शहरी भागात आणून महाविद्यालयीन विद्यार्थी, रिक्षाचालक अशांना तो विकला जात असे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बागडे यांनी सांगितले.
आपल्या प्रभागात गांजा विक्री होत असल्याची माहिती कोणालाही असल्यास किंवा संशय असल्यास जागरुक नागरिकांनी त्याची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी. अंमली पदार्थांचे व्यसन तरुण पिढीला लागत असून त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविषयी माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 Comments