धुळे, ---बोरविहीर (ता.धुळे) ते नरडाणा या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला चालना मिळाली आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली जात असून, नोटीस प्रसिद्ध झाली आहे. धुळे तालुक्यातील १९ व शिंदखेडा तालुक्यातील ५ गावांतील दोनशे हेक्टर जमीन या मार्गासाठी पहिल्या टप्प्यात संपादित केली जाणार आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेनंतर रेल्वेमार्गाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात होईल. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी नरडाणा रेल्वेमार्ग हा पहिला टप्पा मानला जातो आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, धुळे-चाळीसगाव-औरंगाबाद-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण, सुरत-जळगाव रेल्वेमार्गासह इतर कामाचे उद्घाटन, भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग धुळे-चाळीसगाव रेल्वेमार्गाला धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे छेदतो. त्यामुळे धुळे-नरडाणा या मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात झाल्यास मध्य व पश्चिम रेल्वे हे दोन्ही मार्ग जोडले जातील. त्यादृष्टीने धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर काहीही होत नव्हते. आता मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरील बोरविहीर-धुळे-नरडाणा या मार्गाच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली असल्याने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक संकेत मिळत आहे. नरडाणा रेल्वेमार्गामुळे मध्य व पश्चिम रेल्वेमार्ग एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे गुजरात,राजस्थान भागातून येणार्या व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण भारतात जाणार्या गाड्या ह्या सुरत-नंदुरबार-नरडाणा जंक्शन ते धुळे-चाळीसगाव-मनमाड जंक्शन व तेथून पुणे,नांदेडकडे जाऊ शकतात. त्यामुळे धुळे संपूर्ण देशातील रेल्वेशी जोडले जाईल.
1 Comments
खूपच छान, या कामाला गती मिळणे आवश्यक आहे
ReplyDelete