*प्रतिक्रिया- रामदास वाघ,कापडणे*
स्त्री कुटुंबाचे सौभाग्य, वैभव असते.शरीरात जे काम पाठीच्या कण्याचे तेच काम कुटुंबात स्त्रीचे. स्त्री कुटुंबाचा
आधारवड आहे.स्त्री असेल तर कुटुंब समृद्ध,सुखी,शांत,संस्कारी असते.स्त्री
घराचे चैतन्य,उर्जा आहे.स्त्री घराचा श्वास
आहे. स्त्री असलेले घर नंदनवन आहे,स्वर्ग आहे. ज्या घरात स्त्री नसेल ते घर नरकापेक्षा कमी नसते.स्त्री नसेल तर घर,माणूस,कुटुंब कोलमडून पडते. ती नसेल तर घर स्मशानभूमी होते,वाळवंट होते. तीच तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील सुखांची जननी,सुखाची ,आनंदाची जन्मभूमी.
स्त्री अनेक रुपात ,अनेक नात्यात जीवन
व्यतीत करत असते. कुटुंबात आई,आजी,आत्या,बहीण,पत्नी,मुलगी, भावजयी, मामी,काकू अशा अनेक नाते निभावते. त्या नात्यांचे प्रेम देते. अशा सर्व पवित्र नात्यांच्या परिसस्पर्श देत माणसाचे जगणे सोन्याचे करते. प्रेमाचा,मायेचा ओएसीस निर्माण करते. 'ती' आईच्या रुपात तेहतीस कोटी देवतांची देवता आहे. पत्नीच्या रुपात मांगल्याची खाण आहे.कन्येच्या रुपात जीवनाची ,सुखदुःखची गोडी वाढवणारी कल्पकता आहे. नातीचं तर विचारूच नका. जीवनाचा कंटाळा आलेल्या ,मरणपंथाला टेकलेल्या आजोबा-आजींसाठी 'मृत्यूला म्हणती सबुर' ठरणारी दिव्य वरदानच आहे. जीवनातील सर्व क्षेत्रात माणसाच्या आयुष्यातील हिरवळ कायम टिकविण्याचे काम करणारे अजब रसायन आहे .
'गल्लीनी भाऊबंदकी' या
अहिराणी ललित गद्य वजा आत्मकथनात
लतिका चौधरी यांनी स्त्रीचे अशा अनेक रूपातील,नात्यातील, विविध भूमीकेतील स्त्री रूप अतिशय सुंदररित्या ,लालित्यपूर्ण भाषेत ,विशिष्ट शब्दशैलीतून चितारले आहे. व्यक्तिचित्रण करताना ग्रामीण परिसर ,तेथील वास्तू वर्णन ,परिसर वर्णन ,ग्रामीण भागातील पहाट ,सकाळ,दुपार,रात्र सुंदर साजेशा शब्दात चितारले आहे. ते वर्णन वाचताना वाचक त्या प्रसन्न ,आल्हाददायक वातावरणात पोहोचतो. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील स्त्री पुरुष यांचे वागणे ,जगणे , बोलणे, नेहमीच्या वापरात येणाऱ्या ग्रामीण म्हणी ,वाक्प्रचार भरपूर प्रमाणात वापरले आहेत.
लतिका चौधरी यांचे हे लेखन म्हणजे खान्देशी ग्रामीण संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे.
एवढेच नव्हेतर सदरहू लेखनात स्त्रीचा जन्म,जगणे,वागणे,भोगणे,साहणे सुंदररित्या मांडलंय.कुणी मनू म्हणतो की स्त्री दासी आहे.
अरे बापड्या, स्त्री दासी नाही तर भुवरचे नंदनवन आहे. 'ती' प्रत्येक कुटूंबावर आपल्या प्रेमाने, कष्टाने ,समर्पणाने ,त्यागाने अधिराज्य करणारी, जळणारी ज्योत आहे.
ती एकाच वेळी 'राजा' आणि 'प्रजा' अशा दोन भूमिका जगते. ती अशी नदी आहे की वाहती धार कुशीत असूनही सदैव तहानलेलीच आहे. ती असा वृक्ष आहे की जगाला सावली देऊनही सदा जळणाऱ्या उन्हात होरपळतेच आहे. असा दिवा आहे की स्वतः जळत जळत जगाला उजड देता देता सदैव नव्या उमेदीने जळतच आहे. तरीही ती दासी? तरीही 'ती' अन्यायग्रस्त? तरीही ती व्यवस्थेची बळी?
एक मात्र सत्य की मनुचे वक्तव्य जरी समीक्षेचा विषय असला तरी प्रत्येक कुटुंबातल्या मनूशी आजची स्त्री संघर्ष करत आहे असे नाही का तुम्हाला वाटत? या कथेची नायिका रुखमामाय. अतिशय स्वाभिमानी, स्वावलंबी, मोठ्या मनाची ,रसाळ वाणीची,मधाळ अंतकरणाची स्त्री. ग्रामीण संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झालेली, जात, धर्म,पंथ, उच्च नीच भेदांच्या पलीकडे गेलेली, मानवतेच्या गौरी शिखरावर समतेचा ध्वज फडकवणारी, थोर मनाची रखमामाय खरोखरच ह्या कथेची नायिका शोभते. तिच्या सया- बहिणी देखील जिवाला जीव लावणाऱ्या, एकमेकांच्या दुःखात भागीदारी करणाऱ्या आहेत. तो
काळच मंतरलेला होता. त्या काळातील गावातील,गल्लीतील,शेजारील आयाबाया दिवसभर कष्ट करून रात्री विरंगुळा म्हणून एकत्र जमायच्या.बसायच्या.अंगणात सरकारी दिव्याखाली खाटेवर बसून दुःख सुख
वाटायच्या.एकमेकींना धीर द्यायच्या. आधाराचा हात देत असत. जीवन जगण्याचा गोड मंत्र देत, रहाटगाडे हाकलण्याचे मंगलस्तोत्र सुरांमध्ये गाण्याचे बळ देत, जीवन जगण्याची उभारी वाढवत वाढवत डोळ्यांमधील 'आसू'चे चैतन्यमयी 'हसू'मध्ये कसे रूपांतर करीत हे कळतही नसे. सया- बहिणी म्हणजे नेमके तरी काय हो? पाठच्या बहिणी बालपणी, लहानपणी आपल्याबरोबर खेळत, बागडत असतात. झगडतात. रुसतात. कट्टी फु करतात. व पुन्हा एकत्र येतात. हा सारा जीवनाचा सारीपाट असतो, अज्ञानात आनंद लुटण्याचा, बालपणीच्या निर्मळ, निरागस जीवनाचा.
एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन, एकाच रक्ताचे नाते लेवून, हसत-खेळत नकळत 'संसार' नावाच्या अग्निकुंडात होणारा प्रवेश किती वेदनादायक असतो, याचे उत्तर खुद्द विधाता की देऊ शकत नाही. सीतामायच्या भरलेल्या वैभवसंपन्न घरात जन्मलेल्या शेवंतीला सासरी गेल्यावर समजते की, जीवन नेमके काय असते. बालपणीचा रम्य काळ अचानक अग्निचा तप्त गोळा कसा होतो, याचे भान सासरी आल्यावरच शेवंतीला कळते. शेवंती म्हणजे एक जगावेगळं पुस्तक. दुःखाला उराशी कवटाळून रडत कुढत बसण्याचा संस्कार तिला सीतामायने दिलेला नव्हता. ती खंबीर,स्वाभिमानी आणि येणार्या संकटाशी झुंज देणारी आधुनिक काळातील झाशीची राणीच! संकटे तिच्यासमोर थिटी पडली. त्रास देणारी सासू पराभूत झाली. व्यसनी नवरा आतल्याआत जळत राहिला. पण शेवंती? शेवंतीच्या फुलाप्रमाणे फुलत राहिली. हे तिचे फुलणे मनाचे होते. हे तिचे उमलणे अंतःकरणाचे होते. तिच्या ह्या मनाच्या मोठेपणामुळे तिने फक्त कुटुंब संस्थेवर मात केली नाही, तर गल्ली, समाज यांच्या सीमारेषा ओलांडून माहेरची शेवंती सासरची रखमामाय झाली. प्रत्येकाच्या हृदयमंदिरातील ती रखूमाई झाली.
आता रखुमाई की फक्त सती, ईंदू, मीरा, मंगल, तीन मुलं आणि छोटीचीच आई राहिली नाही तर ती गल्लीतील, गावातील
,समाजातील सर्वांचीच माय झाली. जात, पंथ, धर्माची क्षितिजे तोडून ती समद्यांची आई झाली. गावाची माय झाली. सार्या सांसारिक जाचांचा पाचोळा करून वात्सल्याचा भंडारा लेकरांना लावत रखमामाय एक आदर्श जगन्मातेचे जीवन अगदी सहजपणे जगत होती. तिच्या जगण्याला सुंदर करीत होत्या तिच्या सया-बहिणी- सुंदरामाय, रामामाय
, न्हानमाय, तसेच मुस्लिम भगिनी- हाजराकाकू ,हानिफाकाकू ,,
शानुरभाबी ,हाजी माय , लुका बेन या
जीवाला जीव देणाऱ्या मैतरणी. पाठच्या बहिणींचीही कधी आठवण नाही येऊ नये इतक्या माया लावणाऱ्या ,प्रेम देणाऱ्या, सुखदुःखात सारखाच वाटा उचलणाऱ्या, अडीअडचणीत साथ देणाऱ्या, जीवनाचा भार हलका करणाऱ्या, अश्रुंचे मोत्यांमध्ये मध्ये रूपांतर करणाऱ्या, वेदनांची फुले करणाऱ्या, रक्ताच्या नात्यांनाही लाजवतील इतक्या काळजी वाहणाऱ्या सयाबहिणी रखमामायच्या आयुष्याचे नंदनवन फुलवत ठेवत होत्या.
अर्थात एका हाताने टाळी वाजत नाही. रखमामाय स्वतः मायाळू स्वभावाची होती. घरची आर्थिक परिस्थिती जरी जेमतेम होती तरी घासातून घास देण्याची तयारी दाखवत होती. अडीअडचणीत धावून जात होती. सुखदुःखात सहभागी होत होती. गल्लीत,गावात कुणाकडेही काही कार्यक्रम असला तर रात्र रात्र ,दिवसभर त्या घरच्या लोकांना मदत करत होती. त्यामुळे तिलाही प्रेम,माया,मदत मिळत होते. कदाचित ह्या एकमेकांना आधार होण्यामुळे रखमामायला सोसण्याची ताकद मिळत असे. त्यामुळेच रखमामाय सासूचा त्रास, नवऱ्याची मारहाण, व्यसन, छळ, अपार कष्ट आणि आठ मुलांचे संगोपन या साऱ्यावर मात करून समर्थ स्त्री जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवत होती.
पोटच्या मुलींच्या विवाहाबाबत मात्र रखमामायची धीरोदात्त वृत्ती कमी पडताना दिसते. मुलींच्या लग्नाबाबत असा डोळसपणा तिच्याजवळ नव्हता असे नाही.पण 1925चा कालखंड. म्हणजे जवळपास पारतंत्र्याचा काळ.
रखमामायने महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द ,चळवळी ,बातम्या कर्णोपकर्णी ऐकलेल्या. इंदिरा गांधी यांचा राजकीय काळ पाहिलेला. आणीबाणीचा काळ सोसलेला. बायकांना फारसे स्वातंत्र्य नव्हते. घरची परिस्थिती दोन घासासाठी झगडत असताना रखमामाय एकटी बाईमाणूस काय, कशी विचार, कृती करेल? कुठे ,कशी स्थळ शोधायला बाहेर पडेल ? रखमामायचा नवरा घरात लक्ष घालत नव्हता. मुली लग्नाच्या झाल्यावर त्याची चिंता तिलाच होती. जबाबदारीतून मुक्त होणे एवढेच काय ते डोळ्यापुढे ध्येय ठेवत, आले ते स्थळ स्वीकारून रखमा मुलींना संसाराला लावत राहिली असावी. पण स्वतः अशिक्षित असूनही जमेल तसे मुलांना शिक्षण देत होती. अभ्यास,वाचन हट्ट करत मुलांना शिक्षण ,ज्ञानामृत प्राशन करू देत होती. यात तिचा दूरदृष्टीकोण दिसून येतो. 'कष्ट हीच आयुष्यात पुरणारी खरी शिदोरी आहे' हे तत्त्व अंगीकारत रखमामाय पोरांसह जीवन जगत होती.
'आईचे तसे बाईचे' उक्तीप्रमाणे मुलींच्या नशिबीही भोग वाढून आला. सासुरवास सोसण्याचा काळ तो ,मुलींचे आयुष्य ,स्वप्न गिळत राहिला.मोठी मुलगी सती ,लाडकी पण खट्याळ. तिच्या नशिबी बरंच वाढून आलं. वैवाहिक जीवनसुख लाभलं नाही. पती कमालीचा भोळा. तिचे मन सासरी रमेना. महिनो-महिने तिचे माहेरी राहणे रखमामायला चिंताजनक वाटू लागले. 'पोरीची जात नांदती बरी की मरती बरी' ही नांदणाऱ्या मुलीबाबतची प्रतिक्रिया समाजाला नवी दृष्टी देणारी, शिकवण नवे देणारी नव्हे काय?
दुसरी मुलगी ईंदू ,तिच्याही लग्नाबाबत घेतलेला निर्णय वाचकांना योग्य वाटत नाही. बिजवर स्वीकार करून तिचे लग्न करून दिलेले. पण सुदैवाने नवऱ्याच्या पुरोगामी धोरणामुळे शिकून मास्तरीन होते. त्यामुळे तिच्या जीवनात आनंदाची पालवी बहराला येते. 'नवरा शहाणा, तिचा संसार शहाणा' या म्हणीची प्रचिती येथे येते. मीरा ही तिसरी मुलगी. तिच्या भाळीही वनवास वाढून येतो.तिचाही नवरा दारुड्या. 'जावई गरीब असो, पण निर्व्यसनी आणि व्यवहार चतुर असावा ' हे रखमामायचं स्वप्न स्वप्नच राहतं. बाप आधार न झाल्याने एकट्या रखमामायचे चातुर्य उणे पडते. मंगल ही रखमामायची चौथी मुलगी. तिच्या नशिबातही अठराविश्वे दारिद्र्याचा लेख लिहिलेला. शिक्षणाचा अभाव म्हणून संसारही फाटकाच झाला असावा. पण तरीही महत्वकांक्षी स्वभाव असल्याने मंगल स्वतः घरीच वाचायला,लिहायला शिकली. स्वाध्याय कार्य स्वीकारले. व समाधानकारक जीवन जगू लागली.
आठ लेकरांच्या पालन पोषणाचा ,कुटुंबाचा सगळा भार आईवर असल्याने रखमामायकडून काही गोष्टी पेलल्या गेल्या नसल्या तरी मुलींना - ' सासरी थोडेफार सहन करावे लागते, सर्वच गोष्टी मनासारख्या मिळत नाहीत, आहे त्यात समाधान मानून समायोजन करावे लागते, मोठ्यांची मनं जपावी लागतात, आई वडिलांचे ,माहेरचे नाव काढणे सोपे नसते, मर्यादेत बोलायचे,रहायचे...' इ संस्कार,शिकवण दिल्याने मुली सासरी नांदत होत्या. बाप दारूमध्ये बुडालेला, आई भाकरीच्या प्रश्नांनी ग्रासलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित अचूक निर्णय घेण्याचे ठरविले असूनही परिस्थितीला शरण जावे लागले असेल नक्की.अन्यथा एवढी धोरणी,चतुर, सोशिक, समंजस स्त्री ,मातेच्या रुपात आपल्या मुलींच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही हे ही तेवढेच खरे. छोटी ही रुखमामायचे शेंडेफळ. तिचा जन्म नकोस असूनही ती सर्वांना हवीहवीशी वाटावी अशी. तिच्या जन्मानंतर बापाचं व्यसन कमी होणं, घरी, कुटुंबात रंगणं, रुखमायचा छळ कमी होणं, घरची आर्थिक परिस्थिती जरा
सुधारणं, खरेतर भावंड मोठी झाल्याने त्यांचा आर्थिक हातभार वाढला होता. तरी छोटी अतिशय चपळ,चलाख, कृतिशील, अभ्यासू निघाली. वाचन,कविता पाठांतर , पाढे पाठांतर इ त रस दाखवत असल्याने सर्वांची लाडकी झाली. लाडाने वाढत असूनही चतुर बुद्धी असल्याने शेफारली नाही.आईचे संस्कार उचलत सर्वगुणसंपन्न होत गेली. मात्र भातुकलीचा खेळ खेळतानाच परकरी खाच्यात भोगवटा आला. कथा छोटीच्या वेदनादायी जीवनापर्यंत वळण घेत घेत येते. बालपणीच वैधव्य पदरी येतं. छोटी खचते, नैराश्याने ग्रासते. पण तिच्या रंध्रात रखमामायचे रक्त,संस्कार वाहत असल्याने छोटी नवे स्वप्न ,नवे ध्येय डोळ्यासमोर ठेवते. छोटी हुशार, कष्टाळू, , नवे नवे स्वप्न पाहणारी ,नव्या गतिमान जगाच्या नव्या पंखांवर आरूढ होऊन जीवनाच्या आकाशाला गवसणी घालण्याचं एक आगळंवेगळं स्वप्न पाहणारी. पण तिचे स्वप्न जखमी पक्षीणी प्रमाणे चक्रीवादळात गिरक्या घेत दिशाहीन झाले.
सासरचा होणारा असह्य त्रास सोसणे, माहेरी अवहेलना, अपमान सहन करणे, तिच्या मनाची घालमेल आणि शिक्षणाची थांबलेली गाडी या गोष्टींनी छोटी खरेतर होरपळून गेली. माहेरी येऊन प्रश्न अधिकच बिकट झाला. तिला समजून घेणारी मानवताच तिला लाभत नव्हती. पण तिने जिद्दीने शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. तरी तिच्या जीवनाची दैना थांबत नव्हती. तिच्या मानसिक अवस्थेत त्सुनामी लाटांची अतिक्रमणे होत राहिली. जीवनात ,संसारात बायकोला समजून घेणारा पती नसेल,सासर-माहेर नसेल तर कुटुंबात आणि समाजात मिळणारा मानसन्मान देखील स्त्रीला मिळणे ।मुश्किल होते.अशी गत साहणाऱ्या रखमामाय आणि तिच्या मुलींची कथा वाचकांना वेदना,व्यथा देत उत्सुकता सतत वाढवत वाढवत पुढे नेते. छोटीच्या वैवाहिक जीवनाच्या वेदनेत वाचक पण शेवटी खिन्न होतो. पण संस्कारी, सहनशील, बाईपण उत्कृष्टपणे जगणाऱ्या रखमामाय, तिच्या मुलींबद्दल आदर, सहानुभूती वाटते. छोटीने प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन,स्वतः च्या हिंमतीवर शिक्षण पूर्ण करून जे जगणे यशस्वी बनवले, स्वतः च्या पायावर उभे राहत स्वावलंबी ,स्वाभिमानाचे जगणे निर्माण केले ते स्त्रीयांसाठी आदर्शवत, प्रेरणादायी आहे. स्त्री कधीही अबला नव्हती, तिने ठरवले तर ती कोणतेही दिव्य पार पाडू शकते हे छोटीने तिच्या जगण्यातून सिद्ध
केले आहे. 'गल्लीनी भाऊबंदकी' हे अहिराणी ललीतगद्य , त्यातील प्रभावी मांडणीचे चारित्र्य वर्णन, ग्रामीण जीवन, वातावरण ,संवाद, अहिराणी शब्दशैली वाचकास भावेल हा विश्वास. लतिका चौधरी यांच्या भावी लेखनास शुभेच्छा चिंतीतो. थांबतो.

0 Comments