Header Ads Widget

धुळ्यात डॉक्टरांकडे रोकडसह लाखोंचे दागिने लंपास



धुळे : शहरातील गोळीबार टेकडी परिसरात वैभव नगरातील दंतवैद्याचा बंगला फोडून चोरट्यांनी ४० हजाराच्या रोकडसह लाखोंचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी पुरावे संकलनासह चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

वैभवनगरात प्लॉट नंबर ४७ मध्ये रतनेश बंगला आहे. तेथे डॉ. विशाल वाणी यांचे वास्तव्य आहे. त्यांचे आईवडील काही दिवसांपूर्वी बंगळूरला मोठ्या भावाकडे गेले होते. दोन दिवसांपासून डॉ. वाणी यांच्या लहान मुलीची प्रकृती ठिक नसल्याने तिला अशोकनगर येथील संगोपन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे डॉक्टर दांपत्य तिच्यासोबत होते. त्यांची मोठी मुलगी शाळा असल्याने शेजाऱ्यांकडे राहत होती. शनिवारी सकाळी डॉ. वाणी यांची पत्नी मुलीला तयारीसह शाळेत पाठविण्यासाठी घरी आली. त्यांना बंगल्याच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली. त्यांनी डोकावले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. डॉ. वाणी यांना माहिती मिळाल्यावर तेही घरी आले व त्यांनी शहर पोलिस ठाण्याला ही माहिती दिली. पोलिस पथक आल्यावर तपास सुरू झाला. समाधानाची बाब म्हणजे काही दागिन्यांवर चोरट्यांची नजर पोचली नाही. सौ. वाणी यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि चांदीची भांडी चोरट्यांच्या नजरेतून सुटल्याने त्या घरात राहिल्या.

Post a Comment

0 Comments