१ जुलैपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी आली आहे. त्यामुळे अशा प्लॅस्टिकची विक्री, वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपा पथकांकडून कारवाई सुरु आहे. गेल्या तीन दिवसात पथकाने आठ जणांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ४० हजार रुपये दंड वसूल केला. यात डेअरी चालक व इतर दुकानदारांचा समावेश आहे. एका ब्युटी पार्लरमध्येही प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने तेथेही पथकाने कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, संदीप मोरे, महेंद्र ठाकरे, साईनाथ वाघ, शुभम केदार, मुकादम शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. प्लॅस्टिक विक्री, वापर आढळल्यास संबंधिताला पहिल्यांदा पाच हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास दहा हजार तर तिसऱ्यांदा आढळल्यास थेट २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
परिणाम जाणवतोय
दरम्यान, १ जुलैपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी आल्यानंतर शहरातील अनेक डेअरींमध्ये प्लॅस्टिक पिशवीतून दूध देणे बंद झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्राहक आता भांडे घेऊनच डेअरीत जातात. भाजीपाल्यासह इतर दुकानदारही प्लॅस्टिक पिशव्या देत नसल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी मात्र अद्यापही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसतो.
उपायुक्तांकडून पाहणी
प्लॅस्टिक बंदी, स्वच्छता, घरोघरी कचरा संकलन, गटारांची स्वच्छता, अनधिकृत बॅनर, अतिक्रमण आदींच्या अनुषंगाने उपायुक्त श्रीमती डॉ. नांदूरकर यांनी बुधवारी (ता.६) प्रभाग-७ मध्ये कुमार नगर भागात पाहणी केली. सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, मुकादम किशोर तेलंगी, सतीश पिवाल, सिद्धार्थ लोंढे आदी उपस्थित होते.
प्रभागात काही ठिकाणी गटारांची साफसफाई व इतर स्वच्छतेच्या समस्या आढळून आल्याने स्वच्छता निरीक्षक श्री. मोरे, मुकादम श्री. तेलंगी व श्री. पिवाल यांना नोटिसा बजावण्यात आल्या. दरम्यान, घरोघरी, दुकानांमध्ये कचरा संकलनासाठी डस्टबीन आवश्यक असल्याचेही उपायुक्त डॉ. श्रीमती नांदूरकर यांनी संबंधितांना बजावले. एका ठिकाणी डस्टबीन आढळून न आल्याने संबंधिताला २०० रुपये दंड करण्यात आला.कर्मचाऱ्यांना नोटिसा
0 Comments