Header Ads Widget

दोंडाईचा, मालपूर पाणीटंचाईमुळे अमरावती धरणातून पाणी सोडले



दोंडाईचा (जि. धुळे) : पाऊस लांबणीवर पडल्याने (मालपूर ता. शिंदखेडा) येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याच्या निवारणार्थ येथील अमरावती धरणातून रविवारी (ता.३) रिव्हर गेटमधून पाणी सोडण्यात आले आहे.

धरणात सद्य:परिस्थितीत ९ टक्के जलसाठा आहे.

पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. आतापर्यंत पाणलोट क्षेत्रासह परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. धरणातही पाण्याने तळ गाठायला सुरवात केली आहे. त्यामुळे आहे ते पाणी टिकून ठेवणे गरजेचे झाले आहे. भविष्यात पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती टाळण्यासाठी धरणातील पाणी काटकसरीने वापरावे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या महिन्यात कापूस पीक लागवडीसाठी धरणातून पाण्याचे आवर्तन उजव्या, डाव्या कालव्यातून सोडले गेले. कालव्यांची अनेक ठिकाणी गळती असताना पाण्याची नासाडी झाली. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत चारीद्वारे पाणी पोचलेच नाही. त्यासाठी येणाऱ्या काळात संबंधित विभागाने नियोजन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली गेली. दोन्ही कालव्यातून पाणी किती जाते. कुठपर्यंत पोचते. कुठे वाया जाते या बाबींचे परीक्षण निरीक्षणासाठी संबंधित विभागाकडे कर्मचारीच नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी झपाट्याने कमी झाल्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने कालवा निरीक्षकाचीही नेमणूक करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आता अमरावती धरणात केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

"ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी अमरावती नदीच्या पात्राला लागून आहेत. एक ते दीड किलोमीटर अंतरावर धरण आहे. पाणी विहिरी पर्यंत येईल त्या अनुषंगाने पाणी सोडावे अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने केली होती." -पियुष पाटील, अभियंता, अमरावती धरण

Post a Comment

0 Comments