Header Ads Widget

*शिंदखेडा येथे सहकार सप्ताहानिमित्त प्रशिक्षण कार्यक्रम-- महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा- संजय गिते*



शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --
 महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सहकार क्षेत्राने उत्पादन केलेल्या वस्तूंचा वापर होतो. महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक विकासाचा समतोल राखण्यासाठी ग्रामीण विकासात सहकार क्षेत्राने मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर पत नसलेल्या अति सामान्य माणसांना पत देण्याचे कार्य सहकारी पतसंस्थांनी केले आहे. असे प्रतिपादन संजय गीते यांनी केले. 
येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रामीण सहकारी पतसंस्था सभागृहात ६९व्या अ.भा.सहकार सप्ताहानिमित्त नागरी व पगारदार सहकारी पतसंस्था पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांसाठी  आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी संजय गीते यांनी शिंदखेड्यासारख्या अतिशय ग्रामीण भागात पतसंस्थेने अत्याधुनिक व सुसज्ज स्वमालकीची इमारत बांधल्याबद्दल कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे सल्लागार प्रा.सतिष पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.परेश शाह , शिंदखेडा वि.का.सोसायटीचे चेअरमन डी.टी.चौधरी व सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी महाले हे होते. या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांच्या वतीने सहकार प्रशिक्षण केंद्र,जळगांवतर्फे करण्यात आले होते.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्रा.सतिष पाटील यांनी आपल्या मनोगतात सहकार क्षेत्राचा उगम, विकास व सद्यस्थिती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माणूस हा मुळातच समाजप्रिय प्राणी असून एकमेकांना सहाय्य करुन सामुदायिक प्रगती साधता येते. सहकार क्षेत्रामुळे संविधानातील लोकशाही मूल्याला बळकटी मिळते असे प्रा.पाटील यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून सहकार सप्ताहाचे दिमाखात उद्घाटन झाले. 
त्यानंतर दोन सत्रांत प्रमुख मार्गदर्शक अकोला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आर.एस.बोडके यांनी पतसंस्थेचे कर्जवाटप, थकबाकी, वसूली, त्या संदर्भात कायद्याच्या तरतुदी, एम.आय.एस.अहवाल, नियामक मंडळ या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशि‌क्षणार्थींच्या शंकांचे समाधान करण्यात आले. एकूण पन्नास प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण उद्घाटन व प्रशिक्षण सत्रांचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संयोजक प्रा. प्रविण बडगुजर, उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र, जळगांव यांनी केले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे मॅनेजर संदिप साळुंखे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments