Header Ads Widget

बोरविहीर-धुळे-नरडाणा हा पाचशे कोटींच्या निधीतील ५०.५६ किलोमीटर मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचाच पहिला टप्पा होणारच, खासदार डॉ. सुभाष भामरे



धुळे--- रेल्वेविषयी आमच्याकडे प्रस्ताव नसल्याचे जेएनपीटीने उत्तर दिले. त्यामुळे धुळेकरांमध्ये संभ्रम निर्माण होऊ पाहत होता.मात्र, रेल्वे मंत्रालयाने या मार्गाची आर्थिक जबाबदारीही घेतली

असून, बोरविहीर ते नरडाणा मार्गासाठी होणारे भूसंपादन त्याचाच पहिला टप्पा असल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागरी हक्क संरक्षण समितीने जिल्हा प्रशासनाकडे रेल्वेमार्गाबाबत माहिती जनतेसमोर मांडावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हा रेल्वेमार्ग होईल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी खासदार भामरे यांनी मंत्री वैष्णव यांचे पत्र व संवादाची व्हिडिओ क्लिप पत्रकार परिषदेत सादर केली. दुसऱ्या टप्प्यात मनमाड-मालेगाव-धुळे व नरडाणा ते सेंधवा, असे काम होईल. या रेल्वेमार्गासाठी सर्व निधी रेल्वे मंत्रालय देणार आहे. बोरविहीर (ता. धुळे) ते नरडाणा (ता. शिंदखेडा) रेल्वेमार्ग म्हणजे सेंट्रल व वेस्टर्न रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.खासदार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गाचे पूर्वी दौऱ्यावर असताना उद्‌घाटन केले होते. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. बोरविहीर-धुळे-नरडाणा हा पाचशे कोटींच्या निधीतील ५०.५६ किलोमीटर मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचाच पहिला टप्पा असल्याचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी दिले आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. रेल्वेमार्ग, तीन राष्ट्रीय महामार्ग, सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना यामुळे कारखानदार, गुंतवणूकदार जिल्ह्याकडे आकर्षित होतील. पहिल्या टप्प्यात ३० गावांच्या क्षेत्रात भूसंपादन होईल. त्यात ४.३४५ हेक्टर सरकारी व ३०१.३८ हेक्टर खासगी जागा आहे. सहा महिन्यांत भूसंपादन पूर्ण झाल्यावर निविदा निघेल व रेल्वेमार्गाच्या कामाला सुरवात होईल. या मार्गावर बोरविहीर, न्यू धुळे, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा येथे स्टेशन असेल. या स्थितीमुळे धुळेकरांनी गैरसमज करू नये, असे आवाहन खासदारांनी केले.

Post a Comment

0 Comments