आदरणीय डॉ. अशोकराव महाजन, संचालक भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि. जळगाव यांच्यातील अचाट बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती व कमालीच्या जिज्ञासूपणाची दखल घेऊन त्यांनी विद्यापीठातील प्रयोगशाळेत भारत सरकारच्या नॅनो मिशनच्या प्रकल्प अंतर्गत त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. विलास पाटील व संशोधन कार्यातील सहकारी डॉ. ललीत पाटील यांनी तयार केलेल्या सेमिकंडक्टर चिप प्रकारातील पीईएएलडी
मशीनची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार एक कोटी वीस लाख किंमत असलेल्या संचाची निर्मिती केवळ पस्तीस लाखात तयार करुन दाखवण्याच्या महत्वपूर्ण धाडसाची केंद्रीय पातळीवर दखल घेत वीस वर्षासाठी त्यांच्या पेटंटला मान्यता दिलेली असल्याचे केंद्र सरकारचे पत्र नुकतेच प्राप्त झालेले आहे. ही बाब अत्यंत अभिमानाची व खानदेशासाठी तितकीच गौरवास्पद आहे.
डॉ. अशोक महाजन हे चाळीसगाव तालुक्यातील पळासरे या छोटेखानी गावातील मा. महादू बारकू महाजन यांचे ज्येष्ठ सुपुत्र होत. डॉ.अशोक महाजन यांचा अमळनेर तालुक्यातील तांदळी जिल्हा परिषद शाळेत पितांबर दौलत धनगर गुरुजी (लांडगे) मुख्याध्यापक व पंडीत सदाशिव पाटील गुरुजी असतांना तांदळीचे सामाजिक कार्यकर्ते व साहेबांचे नातेवाईक युवराजअण्णा महाजन यांनी त्यांना प्राथमिक शाळेत दाखल केले. त्यांचे मामा समाजसेवक कै. बंडुसिंग धनसिंग उर्फ बंडु नाना यांचेही सहकार्य लाभले. त्यांचे पालन-पोषण तांदळी या आजोळी त्यांची आजी आवडामाय यांनी केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी व त्यांच्या मातृआजोळी तांदळी, ता. अमळनेर व शहापूर ता. अमळनेर येथे पहिली ते सातवी पर्यंतचे पूर्व माध्यमिक शिक्षण घेतल्यावर पुढे पळासरे, मेहुणबारे, खडकी सिम येथून शिक्षण पूर्ण केले. तांदळी येथील त्यांच्या आजोळच्या आठवणी सांगताना डॉक्टर साहेब उन्हाळ्यात अनवानी अवस्थेत पांझरा नदीच्या तप्त वाळूतून पलिकडे पढावदला जातानाचा अनुभव कथन करताना भावनाप्रधान होतात. त्यांच्या बुद्धिमत्तेची व विनम्रपणे वागण्याचे कौतुक तेथील त्यांचे सहपाठी, नातलग व गावकरी आजही करतात.पुढे मराठवाडा विद्यापीठातून एम.एस्सी. ईलेक्ट्रॉनिक्स ही उच्च पदवी ग्रहण केल्यावर धर्माबाद जि. नांदेड येथील कै. लालबहाद्दुर शास्त्री महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. एव्हढ्यावरच समाधान न मानत त्यांनी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम. फील ची पदवी संपादित केली. पुढे पीएच्.डी. झाल्यावर ते जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात कार्यरत असताना आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर विद्यापीठात कुलसचिव म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीमुळे विद्यापीठाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या संशोधनाची दखल घेत देश-विदेशातील मान्यवर विद्यापीठांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले. आजपावेतो इंग्लंड, अमेरिका, जापान, चीन सह जवळजवळ बावीस देशातील विद्यापीठात त्यांच्या कार्यशाळांचे व संशोधनपर प्रकल्पांतर्गत विविध शोधप्रबंधांच्या अनुषंगाने भाषणांचे व चर्चासत्रांचे देखील आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेण्यात आलेली आहे. कुठलाही गाजावाजा न करता संथ गतीने परंतु सातत्याने कार्यमग्न राहणारे डॉ. अशोक महाजन हे तिरमल या भटक्या व विमुक्त समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या थेट संबधीत विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत पोहचवून आपल्या समाजाच्या उन्नतीसाठीदेखील प्रयत्नशील असतात. दिल्ली येथे जाऊन मा. रेणके साहेब व ईधाते साहेबांशी सांगोपांग चर्चा करुन एन.टी.-ब प्रवर्गातील समाजबांधवांसाठी केंद्रातर्फे काय प्रयत्न केले जाताहेत याचा वेळोवेळी आढावा घेत असतात. लोकप्रियतेची कुठलीही आशा आकांक्षा न बाळगता आपला समाज, आपले विद्यापीठ व आपल्या विद्यार्थ्यांसाठी साहेब सतत झटत असतात. आपल्या यशाचे श्रेय डॉ. अशोक महाजन साहेब विद्यापीठातील आपल्या सहकारी बंधू-भगिनींना व आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संघटितपणे व सामुहिकरित्या केलेल्या सहकार्याला देतात. डॉ. अशोकराव महाजन सरांना व त्यांच्या सहकारी बांधवांच्या या टीमवर्कला मानाचा मुजरा.
लेखक- प्राचार्य शिवाजी साळुंके (आप्पा),
चाळीसगाव, जि. जळगांव
मो.8788471292
0 Comments