Header Ads Widget

बापू, तुम्ही आखो जोयजे व्हतात !



खान्देशची मुलूख मैदान तोफ ज्येष्ठ समाजवादी नेते अमळनेरचे माजी आमदार साथी गुलाबराव बापू पाटील यांची दि.22 ऑगस्ट रोजी आपली संघर्षमय जीवनयात्रा संपली. तेव्हापासून वृत्तपत्रातून त्यांच्या संघर्षमयी जीवनाचे अनेक प्रसिद्ध झालेले लेख वाचावयास मिळाले आणि आपण लिहीले नाही तर बापूंप्रती कृतघ्नता ठरेल असे सहज मनात आले आणि जे छापून आले त्याची पुनरुक्ती टाळून काही शब्दात मी त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो. 



12 जून या त्यांच्या वाढदिवशी त्यांची भेट आणि सोबत आमरस-पुरणपोळीचे जेवण ‘कोरोना’ काळ वगळता वर्षोनुवर्षे अटळ असे.  नित्याप्रमाणे अडीच महिन्यापूर्वी 12 जून रोजी त्यांच्या घरी पोहोचलो. दरवाजा जवळ उभे राहून ‘बाबा’ म्हणून हाक दिली. माझ्या आवाजाने ‘शेर’ जागा झाला. मी म्हणालो, ‘‘बाबा व्हयख का?’’ बाबांची स्मृती संवेदना काही प्रमाणात हरपलेली असतांनाही त्यांनी थोडावेळ माझ्याकडे निरखून  पाहिले आणि येरे-येरे म्हणत, ‘धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातोय मल्हार देवाचा’ हे गीत दोन्ही हात वर करून एका सुरात नादात म्हणायला सुरुवात केली. मी जवळ गेलो. चरण स्पर्श केले आणि बापूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तसे बापूंशी माझे नाते सुमारे अर्धशतकाहून अधिक काळाचे. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. मी धुळ्यात स्थायिक असलो तरी माझा जन्म अमळनेर तालुक्यातील असल्यामुळे त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते.  धुळे, अमळनेरला कधीही भेटीगाठी झाल्या तरी उपस्थितांना ते सांगत  असत, ‘‘गोपी आम्हना अमयनेर तालुकाना शे’’ म्हणूनच की काय एक तपापूर्वी त्यांनी आमदार म्हणून मिळणाऱ्या मानधनातून त्यांच्यासोबत काम केलेल्या जुन्या साथींना काही रक्कम मदत म्हणून देण्याची प्रथा सुरु केली. त्यावेळी ‘एकला चालो रे’ साप्ताहिकास पाव शतक पूर्ण झाले म्हणून मदत केली. त्या आर्थिक लाभाचा पहिला लाभार्थी म्हणून माझी निवड केली असावी. मला स्मरते वर्ष 1978 असावे. तो काळ सायकलीने फिरून व पोस्टाने पत्र लिहून प्रचार करण्याचा होता. त्यावेळी मी धुळ्याहून अमळनेर तालुक्यातील माझे स्नेही, आप्तजन यांना पत्र लिहित असे. अमळनेर तालुक्यातील धुळ्यालगतच्या गावांना काही साथींसोबत सायकलीने जावून प्रचार केला. आमचे नेतृत्व धुळ्याचे साथी कै. राम मोरे नाना यांच्याकडे असे. 
बापू विधानसभेत पोहोचल्यानंतर त्यांच्या पांढऱ्या कारने अथवा रेल्वेने धुळे मार्गेच जात असत. काहीवेळा ते जातांना माझ्या यशवंतनगरच्या भटक्या वसाहतीतील जुन्या लहानशा घरी येऊन भोजनाचा आस्वाद घेऊन जात. कधी मी धुळे रेल्वेस्टेशनवर त्यांच्या फोनप्रमाणे डबा पोहचवित असे. मांसाहारी भोजन हा बापूंचा आवडीचा पदार्थ.एकदा त्यांचा फोन आला, ‘‘गोपी मी संध्याकायले येस, साधं जेवण कर मी मांसाहार सोडी दिनं, सातपुड पाटोड्यास्नी भाजी खासू’’ मी समजायचे काय समजलो.  त्यांना मांसाहारीच एक पदार्थ असा खाऊ घातला की, ‘‘बापू म्हणाले, सूनबाईनी शाखाहारी काय चांगल बनाड रे, काय शे हाई गोपी?’’ मी उत्तरलो, ‘‘बापू कांदानी पात टाकीसन वांगानं भरीत.’’ आवडनं गड्या आपले भरीत, काय चव शे? पुढे उनुका असंच भरीत करत जा. खाद्य पदार्थ ओळखला नाही तर ते बापू कसले? नंतर मात्र सर्वच हास्यकल्लोळात बुडाले. बापू म्हणजे अगदी खवय्ये. तापी काठावरचे बापूंवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते घरपोच ‘मासे’ सेवा बजावित असत.  बापू आपली कार घेऊन धुळ्याच्या मच्छीबाजारात दिसले की मासे विक्रेत्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडे. विक्रेत्यांकडून कुठले मासे आहेत अशा विविध नावांचा बापूंवर वर्षाव होत असे. कारण बापूंचे घेणे एक दोन किलो नसे. पाच-दहा किलो शिवाय कमी नाही. अगदी अधून-मधून कोकण दौऱ्यावर गेले की गाडीची डिक्की माशांच्या पॅकेजनी भरलेली असे. बापू एकटेच जेवताहेत असे कधीच झाले नाही. अगदी कार्यकर्त्यांना फोन करून जेवायला बोलवत, सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात जेवण ठरलेले असे. मासे खाल्ल्याने कोण चिकणं दिसतं, कोण खरबुड हा ज्याच्या त्याचा दृष्टी ‘कोन’ आहे, काहींना दृष्टीआड सृष्टीही दिसत असेल, पण बापूंच्या डोळ्यावर मला कधीही चष्मा दिसला नाही. हा मासे खाण्याचाच परिणाम असावा. म्हणून त्यांनी मासे खाण्याची सवय लावलेले आम्ही त्यांचे कार्यकर्तेही विनाचष्म्याने लेखन-वाचन करू शकतो ही वस्तुस्थिती आहे. मासे पुराणातला थोडा विनोदाचा भाग सोडून द्या परंतु बापूंना निवडणूक लढवायची नव्हती किंवा मतेही मागायची नव्हती अशा काळात कधी काळी राबलेल्या कार्यकर्त्यांची आठवण ठेऊन जेऊ घालणे हाच त्यांचा प्रामाणिक हेतू होता. एव्हढेच नव्हे तर  ‘मन्हा मरानंतर, जनताले मासा-बोकड्यानं जेवण द्या’ असेही प्रचलित व्यवस्थेला धक्का देणारं विधानही त्यांनी जाहिरपणे व्यक्त केले होते. 
गुलाबराव बापू म्हणजे लढाया अंगावर घेणारा नेता. जन आंदोलनात एका वर्षात 9 कोर्टात 31 खटले त्यांच्यावर असल्याची नोंद होती. चोपड्याचे माजी आमदार माधवराव गोटू पाटील, माजी मंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी , के. एम. बापू, एकनाथराव खडसे, डॉ. बी. एस. पाटील यांच्याविरुद्धचा त्यांचा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्या ‘साथी संदेश’ च्या साप्ताहिकातून प्रहार केलेले अंक त्या काळात गाजले. ज्यांच्याविरुद्ध लढले, खटले सुरु आहेत त्यांच्याच गाडीत मुंबईला जाणे आणि त्यांच्याच घरी सोबत जेवण करणे हे कदाचित आजच्या ‘खळ-खट्याळ, रामभरोसे’ राजकारण्यांना दंतकथा वाटेल; परंतु ती वस्तुस्थिती होती. एव्हढ्या लढाया अंगावर घेऊनही बापू बिनधास्त फिरत असत.  त्यांची प्रासंगिक समयसूचकता ही वाखाणण्याजोगी होती. एकदा मतदारसंघातच प्रवासात काही लुटारुंनी त्यांची रात्रीच्या वेळी कार अडवली. तेव्हढ्यात बापूंनी प्रसंगावधान राखत लुटारुंना एैकु जाईल अशा आवाजात आवाज दिला, ‘लय रे मन्ह पिस्तुल’ बस एव्हढ्यावर त्यांनी धुम ठोकली. शस्त्राविना काम फत्ते झाले. डोक्यावर लाल टोपी हे जिरेटोप, पोलादी व जाडी-भरडी खादी अंगी एव्हढेच बापूंचे चिलखत होते. त्यांचे चक्रधर (वाहनचालक) ईस्माईलभाई पिंजारी,  कैलासभाऊ जरे हे त्यांचे शेवटपर्यंत निष्ठावंत होते. 
एकेकाळी उभ्या महाराष्ट्रात बापूंच्या वक्तृत्वाचा दबदबा होता. आख्खी विधानसभा सभागृहात ज्यांच्या भाषणाचा प्रत्येक शब्द ऐकण्यास कान टवकारून लक्ष देत असे, ज्यांच्या नावाशिवाय आकाशवाणी-दूरदर्शनवरील विधीमंडळाचे समालोचन पूर्ण होत नसे. विधानसभेतील ज्यांच्या तोफेचा गोळा राज्यपातळीवरील दैनिकात प्रथम पानावर झळकत असे अशी झुंजार लढाऊ काळ्या मातीशी इमान राखणारी, गर्दी खेचणारा नेता म्हणून त्यांची ख्याती  होती. म्हणून राज्यभरातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधी सभांसाठी वक्ता म्हणून बापूंच्या नावाला अग्रक्रम असे. ते आमदार होते. नव्हते तरी सर्वकाळी तहहयात जनतेच्या मनात आमदार म्हणूनच त्यांचे स्थान होते. संकटाच्या वेळी मदतीला धावत जावून अडचणीत सापडलेल्या माणसाला मदतीचा हात देण्याचे काम  करतांना त्यांचा हात कधी आखडला नाही. अडलेल्या -नडलेल्या लोकांसाठी बापू म्हणजे साक्षात ‘देना बँक’ होती. खिशाला आणि मनाला चोरकप्पा नसलेला नेता म्हणजेच ‘गुलाब बापू’. जे आहे ते खान्देशी भाषेत रोखठोक सांगणार. काम होत असेल तर हो, होणार नसेल तर नाही. आगे-मागे काही असा फरक नाही. त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मित्रांपेक्षा विरोधकच अधिक होते. तरीही त्यांच्या फटकळ स्वभावामुळे त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्यांचीही तालुक्यात कमी नव्हती. म्हणूनच खिशातला खडकू न खर्च करता जनतेने लोकवर्गणीतून त्यांना तीन वेळा आमदार म्हणून तालुक्याचा कारभारी केले. हे आजच्या पिढीला अविश्वसनीयच वाटेल. 
गुलाबराव बापूंचे शिक्षण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, एम.ए.बी.एफ. (मॅट्रीक ॲपीअर बट फेल) झाले होते. अल्पसे शिक्षण घेऊनही ज्यांचे कार्य कर्तृत्व एका लेखाचा नव्हे तर ग्रंथाचा विषय बनते, शेकडोंना रोजगार व हजारो शेतकरी श्रमिक कष्टकऱ्यांच्या मुलांना साने गुरुजींच्या नावाने स्थापित शैक्षणिक संस्थेतून विज्ञाननिष्ठ शिक्षणाची कवाडे खुली करून देतात ही बाब नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचे तर असा माणूस हजार वर्षात झाला नाही, हजार वर्षात  होणार नाही. 
खान्देशची मायमाऊली साने गुरुजींचे ऋण ते जाहीरपणे व्यक्त करीत म्हणून बापूंनी स्थापन केलेल्या साने गुरुजी विद्यालयात क्रांतीविरांच्या स्मृती जागविल्या. साने गुरुजींचा वारसा शाळेच्या भिंती दगडांवर कोरला गेला आहे. येणाऱ्यांना चेतना वाटावी असे क्रांतीचे धगधगते यज्ञ पेटविले आहे.  कुणाकडूनही धेला न घेता ठरवून क्रांतीकारकांची नावे दिली. जेव्हा पैसे खाईन तेव्हा तेलगीचे नाव देईन असेही बापू रोखठोक सांगत. तिरंग्यावर प्रेम असूनही शेवटी क्रांतीचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्यात, लाल टोपीत मला न्यावे अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखविली होती. विधानसभेत अहिराणीत शपथ घेणारे खान्देशचे पहिले आमदार म्हणून नोंद असलेले बापू ‘‘अहिराणी बोलाणी लाज वाटत व्हयी ते खान्देश सोडी चालता व्हा’’ असेही परखडपणे सुनावत असत. 
साने गुरुजींप्रमाणे लहान मुलांवरही बापूंचे विशेष प्रेम होते. मुल त्यांना  ‘गोळीवाला बाबा’ म्हणून ओळखत असत. आयुष्याच्या उत्तरार्धात ते सायंकाळी आपल्या वाहनातून ढेकू-अंबासन कडे फिरायला जात. रोज सायंकाळी रस्त्यावर, शेताच्या बांधावर, झोपडी झुग्गीत राहणारे शेतमजुर, सालदारांची, आदिवासींची मुले त्यांची वाट पहात असत. बापूंची गाडी दिसली की ही मुले शिस्तीने रांगेत उभे राहून बापूंशी हस्तांदोलन करीत. बापूंचा वाहन चालक कैलासभाऊ जरे किंवा बापू स्वत: त्या मुलांना चॉकलेट-गोळ्यांचे वाटप करून बालकांशी गप्पागोष्टी करीत. (दोन वेळा मी स्वत: बापूंसोबत अनुभव घेतला) त्यात सायंकाळी रस्त्यावर पायी फिरण्यासाठी निघालेल्या अमळनेरकरांचाही समावेश असे व फिरणारे स्वत:हूनच गाडी थांबवून बापूंकडून गोळी चॉकलेट स्विकारत असत. त्यात राजकीय नेत्या ॲड. ललिताताई पाटील यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असे. 
राजकीय डावपेच म्हणून बापूंच्या काही भूमिकांमुळे ते काही वेळा टिकेचे धनी झाले; परंतु त्या भूमिकांमध्ये त्यांचा हेतू प्रामाणिक होता. ‘सुर्यमुखी’ राजकारणाचा त्यांना तिटकारा होता. बापू खऱ्या अर्थाने शेतकरी काश्तकार, बाराबलुतेदारांचे पुढारी होते. अमळनेरच्या भूमित खऱ्या अर्थाने साने गुरुजींना अभिप्रेत असलेला ‘जगाला प्रेम अर्पण’ करण्याचा धर्म रुजविला. बापू समाजवादाचं बाळकडू प्यालेले होते. त्यामुळे त्यांना ‘शेवटचा समाजवादी गेला’ असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. गुलाबबापू या रांगडा नेत्यानं, ‘खाऱ्या’ आमदाराने आपल्या आयुष्यात अमळनेर परिसरात जी धर्मनिरपेक्ष समाजवादाची पेरणी केली त्यातून अनेक युवा नेते व संघटना ‘नाहिरे वाल्या’ वर्गाच्या बाजूने प्रबोधन आणि संघर्ष करीत आहेत. ज्यांना स्वत:ला समाजवादी म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो अशा त्यात प्रामुख्याने राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, पू. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे तरुण  व अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ  बापूंनी पेटवलेली ज्योत तेवती ठेवतील असा दृढ विश्वास आहे. झाड, झोपडी, नांगरधारी , लाल टोपीशी शेवटपर्यंत इमान राखणाऱ्या बापूंची साने गुरुजी, संत सखाराम महाराज, श्रीमंत प्रतापशेट , उद्योगपती हशीम प्रेमजी यांच्यासोबतच ‘शिंगाडे’ फेम गुलाबबापूंचे अमळनेर अशी अमळनेरची ओळख निर्माण होईल  याविषयी माझ्या मनात सुतरामही शंका नाही. 
बापू, सध्यानी ‘अंधेर नगरी, चौपट राजा’ अशी अंध:कारमय परिस्थितीमा तुम्ही आखो जोयजे व्हतात. ‘साथी तेरे अरमानो को मंजिल तक पहुचायेंगे’ अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील अहिराणी साहित्यिक प्रकाश जी. पाटील यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे-
न्हई कुंडीमा वाढना हाऊ काटेरी गुलाब,
तुन्हा काटाले भ्याईरे, दौड्या मारेरे जुलाब.
तुन्हा कौतुकमा थके मुंबईनी ती लेखनी
तीले बापूनी मूर्तीमा वजी कमाल दिखनी
नाळ जनताशे जोडी बांधा काकरीना धागा
बापू इधानसभामा करे महारथी नागा.

-साथी गो. पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे 
मो. 9422795910


Post a Comment

0 Comments