Header Ads Widget

*डी एस पी साहेब, सावज टप्पामा शे नेम चुकाले नको पण बॉडीबिल्डलरे पैलवान समजी नको ती उपाद नको*

     
          
      मा . श्रीकांत धिवरे साहेब , जिल्हा पोलीस प्रमुख धुळे         स न वि वि                     आपण धुळे जिल्ह्यात रुजू झालात त्या दिवसापासून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे . गुंडाफुंडांनी आपला बोऱ्या बिस्तरा हलविला आहे , अवैध धंदेवाले बिळात लपले आहेत असे वरकरणी दिसत आहे , असे दिसणे सुध्दा शांतता प्रेमी धुळेकरांसाठी आशादायी आहे . नक्कीच आपले प्रयत्न प्रामाणिक आहेत , परंतु आम्हाला काळजी ही वाटते की , आपले सारखे चांगले काम करणारा अधिकारी आजी माजी सत्ताधारी राजकाण्यांकडून वर्षभरातच हटविला जातो .विनोदाने असही म्हटले जाते की , धुळ्यातून बदली हवी असेल तर चांगले काम करा . साहेब , आमचे धुळे खूपच आदर्श आणि सुंदर शहर होतंहो , जयपूरशी धुळयाची तुलना होत असे ., सर्व जाती पंथ धर्माची माणसे एकत्र गुण्या गोविंदाने नांदण्याची धुळ्याची ख्याती होती पण कुणा ' नाट्याची नाट' लागली आणि ती ओळखच पुसली गेली हो . अगदी पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर अनेकांना स्वतंत्र धुळे माहित नाही ते ' धुळा -मालेगाव ' या जोड नावाने ओळखतात . हा अनुभव आपणासही आला असेल . धुळेकर म्हणून घेण्यास लाज वाटावी असेच आजचे वातावरण आहे . 'घडलेले धुळे ते बिघडले कुणामुळे ?हे राजवाडे संशोधन मंडळवाले कधी काळी शोधूनही काढतील परंतु कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उचललेले आपले प्रत्येक पाऊल हे प्रथमदर्शनी ' कणखर ' वाटू लागलेले आहे . ऑपरेशन ऑल आऊटचा ' आपला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु तो केवळ मुख्य हमरस्त्यावरचा असता कामा नये ., या रस्त्यावरच्या अडोशाकडे विशेषतः रात्रीच्या वेळी शाळा महाविद्यालयांची मैदाने, प्रार्थना पुजा स्थळांच्या भिंती बाहेर , नदी नाल्याच्या काठी रात्री रिचविलेल्या शेकडो दारूच्या बाटल्यांचा ढीग काय दर्शवितो ? तिकडेही आपल्या यंत्रणेची वक्रदृष्टी असू द्यावी . साहेब , आपण आगामी लोकसभा निवडणूक डोळयासमोर ठेऊन बॉऊन्सर घेऊन फिरणाऱ्या ' हळद पिवळे ' पुढाऱ्यांना जो इशारा दिला त्याबद्दल आपल्या विषयी शांतता प्रिय धुळेकरांचा आदर नक्कीच द्वी गुणीत झाला आहे . साहेब धुळ्याची ओळख तशी पैलवानांचे गाव म्हणून सर्वदूर होती , कोल्हापूर नंतर कुस्तीची पंढरी म्हणून नावलौकिक होता , शहरात जातीय धर्मीय भेदांची धुस पुस असो की अकबर चौकातील ' हुसेनी मंझील ' सारखी नैसर्गिक आपत्तीची घटना असो त्या काळी सर्व धर्मिय मल्ल आणि व्यायाम प्रेमी खांद्याला खांदा लावून परिस्थितीवर मात करीत असत , त्या काळी धुळ्यातील सर्वच व्यायाम शाळा पैलवानांनी गजबजलेल्या असत . खाजगी सुरक्षा रक्षक अभिकरण परवानाधारक जीम मधील बाऊन्सर व चालकांना सी आर पी सी १४९ प्रमाणे आपण जी नोटीस दिली ती काही वर्षातील अनुभव पहाता गरजेचीच होती . खरं म्हणजे जे जीम मध्ये जातात ते पैलवान नसतात ., आखाडयातील तांबड्या मातीशी त्यांचा काहीही संबंध नसतो .जीम मध्ये जाऊन शरीरयष्टी मिळविलेल्या माझ्या एका मित्राला मी नेहमी विनोदाने म्हणत असे , ' माले देखा आणि मग्गम ऱ्हा ' .केवळ शरीर यष्टी मिळविणे हाच त्यांचा मुख्य हेतू असतो . त्यांचा आखाड्यातील डाव कलाजंग, धोबी , मुलतानी , ढाक , उलटी , निकाल डाव याच्याशी दूरान्वयेही संबंध नसतो . साहेब , आपण आपल्या नोटिसात व्यायामशाळा तेथील पैलवान , आखाडे यांचा जो उल्लेख केला तो न्यायाला धरून नाही . धुळ्यातील कुस्तीप्रेमी पैलवानांना या उद्योगात रसही नाही .oयायाम शाळेतील मल्ल कोणाचेच बॉडीगार्ड नसतात .लढायचे असेल तर ते स्वतःच निवडणूकीला उभे राहुन महापालिकेत निवडून येतात , किंवा आमच्या जिल्ह्याचा ' शिवजोड्या ' मल्ल चाळीसगावचा ट्रीपल महाराष्ट्र केसरी , पोलीस अधिकारी विजय चौधरी पैलवान यांनी एका मुलाखतीत म्हटलेच आहे की , ' पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढविण' , दमदाटी साठी पैलवानच असले पाहिजे असे नाही ,हड्डी फसली एक झालेले पंक्चर , छाती फुगवून चालणाऱ्या बेकारांच्या फौजाही नेत्याच्या संरक्षणाचे काम भागवून टाकतात . साहेब , मला याचेही आर्श्चर्य वाटते की आपल्या नोटीसित ९२ व्यायामशाळा , कुस्तीचे १६ आखाडे यांचा उल्लेख आहे , साहेब , ही ' बाबा आदम ' च्या जमान्याची आकडेवारी आहे . खर तर आपल्याला ही माहिती पुरवणाऱ्या यंत्रणेचा राष्ट्रीय संशोधक म्हणून गौरव व्हायला हवा . साहेब , धुळे शहरात एक फेरफटका मारा , मोजक्या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या व्यायाम शाळा सोडाच तर अनेक व्यायामशाळा या जमीनदोस्त झाल्या आहेत . काहींना तर कुलुप आहे . ज्या सुरू आहेत त्याही मल्लांच्या प्रतिक्षेत आहेत . व्यायामशाळातील मल्लांचा उल्लेख करणे म्हणजे आपली गुप्तचर यंत्रणा आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे .पैलवानांवर विश्वास ठेवावाच लागेल . आपल्या पोलीस यंत्रणेतील ' डीबी ' यंत्रणेचा इतिहास नजरेखालून घालून आपल्या ' डिब्यांमध्ये ' सर्वाधिक संख्या पैलवानांचीच होती हेच आपल्या निदर्शनास येईल  . नोकरीतील पैलवान ' पाक ' व वृद्धपकाळाच्या उंबरठ्यावर असूनही व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करून पोटासाठी केवळ बेरोजगारीमुळे कुस्ती खेळणारा पैलवान ' नापाक ' या भूमिका मला भेदभावी वाटतात . साहेब , अल्पावधीतच या शहरातील जिल्ह्यातील गुंडगिरीचे मुळ तुमच्या लक्षात आले आहे असे आपल्या भूमिकेवरून मला वाटते . आपले ' ऑपरेशन ऑल आऊट ' यशस्वी होण्यापूर्वीच या शहरातील शांततेच्या ( कै ) वैरींनी बदलीच्या मार्गाने आपणास ' आऊट ' करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असतीलच कारण पूर्वानुभवावरून संशयाला जागा आहे .आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आहे , याक्षणी तरी आपली दिशा योग्य आहे . डीएसपी साहेब, ' सावज टप्पामा येयेल शे , नेम चुकाले नको पण बॉडीबिल्डर्सले पैलवान समजी नको ती उपाद नको ' एव्हढीच मन्ही या शहरना शांतता प्रेमी नागरिक म्हणीसन आपले इनंती शे 🙏-        _                   _ आपला चांगला कामना शुभचिंतक,          _      गो .पि . लांडगे     माजी प्रसिध्दी प्रमुख        धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ धुळे ( ज्येष्ठ पत्रकार ) मो न- 94227 95910

Post a Comment

0 Comments