शिरपूर: मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक सांगवी (ता. शिरपूर) पोलिसांनी जप्त केला. महामार्गावरील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर ३१ जानेवारीला रात्री ही कारवाई करण्यात आली.
२३ लाख रुपयांच्या गुटख्यासह सहचालकाला अटक करण्यात आली. सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.
३१ जानेवारीला रात्री त्यांच्या आदेशाने हाडाखेड येथील चेक पोस्टवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री पावणेअकराला सेंधव्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या आयशर ट्रक (एमएच ४३, सीई ०९५०)ला थांबण्याचा इशारा केला असता चालक आणि सहचालकाने ट्रक सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी पाठलाग करून क्लीनर अनुप दिलीपकुमार शुक्ल याला ताब्यात घेतले. ट्रक जप्त करून सांगवी पोलिस ठाण्यात नेऊन झडती घेण्यात आली. ट्रकच्या झडतीत १३ लाख ६५ हजार रुपये किमतीची सुपारी.
विनानावाची सहा लाख ७२ हजार रुपयांची तंबाखू, दोन लाख एक हजार ६०० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू आढळली. ट्रकसह या मुद्देमालाची किंमत ३७ लाख ३८ हजार ६०० रुपये आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी (ता. १) सकाळी सांगवी येथे जाऊन पोलिसांचे कौतुक केले. श्री. धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, मोहन पाटील, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.
0 Comments