Header Ads Widget

धुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह तिघे अटकेत; तोतया जीएसटी अधिकारी बनून पैशांची लूट


धुळे: पोलिस मुख्यालयातून लाल दिव्याचे वाहन उपलब्ध करून देत मुंबई-आग्रा महामार्गावर तालावर नाचणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच तोतया जीएसटी अधिकारी बनवून पैशांची लूट करण्याची टोळी तत्कालीन एका बड्या अधिकाऱ्याने तयार केली.

यानंतर टोळीने ७१ लाख रुपयांची लूट केल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एक पोलिस कर्मचारी व त्याची बहीण, तसेच दुसरा पोलिस कर्मचारी अशा एकूण तिघांना अटक झाली आहे.

लुटीतील रक्कम आणि आरोपीवाढीची दाट शक्यता आहे. दरम्यान, अटकेतील तिघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पटियाला (पंजाब) येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा (वय ५९) यांच्या तक्रारीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात ४ जानेवारीला गुन्हा दाखल झाला.

यात तीन ते चार संशयितांनी संगनमतातून लाल दिव्याची टाटा सुमो वापरून तक्रारदाराच्या ट्रक (पीबी ११, सीझेड ०७५६)ला येथील महामार्गावर अडविले. ट्रकचालकास जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून मालाच्या पावत्यांची पाहणी केली.

काहीतरी चूक काढून तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून प्रथम १२ लाख ९६ हजारांच्या दंडाची मागणी केली. यात तडजोडीअंती एक लाख ३० हजार रुपये गुगल-पेने स्वीकारले. तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने गुन्हा नोंदविला.

पुराव्यांमुळे गुन्हा उघड

जिल्हा पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्रीकांत धिवरे यांच्यासमोर हे प्रकरण आले. त्यातील गांभीर्य लक्षात आल्याने त्यांनी पारदर्शक तपासावर भर दिला. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी आणि पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना तपासाची सूचना दिली. त्यांनी अनेक सबळ पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. या संदर्भात पोलिस अधीक्षक धिवरे यांनी गुरुवारी (ता. १) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

व्यापाऱ्यांना आवाहन

एक खासगी व्यक्ती रडारवर असल्याचे श्री. धिवरे यांनी सांगितले. या प्रकरणी येथील पोलिस कर्मचारी बिपीन आनंदा पाटील (रा. धुळे) व त्याची बहीण स्वाती रोशन पाटील (रा. नाशिक), पोलिस कर्मचारी इम्रान इसाक शेख (रा. धुळे) याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली.

तपासात तोतया जीएसटी अधिकारी बनून आतापर्यंत ७१ लाख ३३ हजार ९८४ रुपयांची संशयितांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. इतर संशयित फरारी असून, त्यांचा शोध सुरू आहे. ज्या व्यापाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी आझादनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. धिवरे यांनी केले.

आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, उमेश बोरसे व कर्मचाऱ्यांनी संशयितांच्या अटकेची कारवाई केली.

दोषींची निलंबनासह चौकशी

या प्रकरणी पोलिस कर्मचारी बिपीन पाटील, इम्रान इसाक शेख यांना निलंबित करून चौकशी सुरू केली जाईल. त्यांनी वापरलेल्या वाहनाचे लॉक बुक सील केले असून, ते जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात नवनवीन बँक अकाउंट समोर येत असून, फसवणुकीची रक्कम आणखी वाढणार असल्याचेही पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Post a Comment

0 Comments