धुळे: बेडरपणे लाल दिव्याचे वाहन उपयोगात आणून मुंबई-आग्रा महामार्गावर तोतया जीएसटी अधिकारी बनून पैसे लुटणाऱ्या टोळीतील चौथा संशयित विनय सुरेश बागूल उर्फ बबल्या (रा. पिंजारी चाळ, रेल्वे स्टेशन भाग, धुळे) यास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास पारदर्शकतेने होण्यासाठी पोलिस उपअधीक्षक हृषिकेश रेड्डी यांच्याकडे सोपविला आहे.
पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सुरवातीपासून या गंभीर घटनेचा पारदर्शकतेने तपास करून उलगडा करण्याचे ठाणले. त्यास यश मिळाले.
तत्कालीन एका बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने तोतया जीएसटी अधिकारी बनवून पैशांची लूट करणाऱ्या टोळीने ७१ लाख रुपयांची लूट केल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस कर्मचारी बिपिन आनंदा पाटील (रा. धुळे) व त्याची बहीण स्वाती रोशन पाटील (रा. नाशिक), पोलिस कर्मचारी इम्रान ईसाक शेख (रा. धुळे) याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यानंतर
संशयित बबल्या बागूल यास अटक करण्यात आली आहे. ज्या व्यापाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी आझादनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. धिवरे यांनी केले.
पटीयाला (पंजाब) येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा (वय ५९) यांची येथे फसवणूक झाल्यानंतर ही घटना उजेडात आली आहे.
0 Comments