शिरपूर/प्रतिनिधी
दि.1 डिसेंबर ते दि.7 डिसेंबर तालुक्यातील मांडळ शिवारात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी दि.30 रोजी रात्री पं.मिश्रांचे शहरात आगमन झाले. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती. त्याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. अनेक भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी, महागडे मोबाईल तर अनेकांच्या खिशातील रोख रकमा लंपास झाल्या आहेत. बऱ्याचशा भाविकांनी रात्री उशीरा शिरपूर पोलीस ठाणे गाठले. शोभायात्रेत भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या चर्चा ऐकू येत आहेत.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यात शिवपुराण कथेला काल दि.1 रोजी सुरवात झाली. दि.7 डिसेंबरपर्यंत कथा होणार आहे. कथेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दि.30 रोजी सायंकाळी शहरात पं.मिश्रांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पं.मिश्रांचे तब्बल 3 ते 5 तास उशीराने आगमन झाले. बसस्थानक परीसरातून शोभायात्रेला सुरवात झाली. रात्री 9 वाजेच्या सुमारास शोभायात्र विजयस्तंभ चौक परीसरात पोहचली. पं.मिश्रांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. त्याचाच गैरफायदा घेत चोरटे सक्रीय झाले. चोरट्यांनी गर्दीत आणि उत्साहात असलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी तर कोणाच्या खिशातून रोकड सहजगत्या लंपास केली.
अनेक भाविकांना शोभायात्रा आटोपल्यावर सोनसाखळी व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यापैकी काहींनी थेट शिरपूर पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे दिसते. शिवपुराण कथेनिमित्त गर्दी होईल असा अंदाज असतांनाही भाविकांनी स्वतःजवळ मौल्यवान दागिने, मोठी रक्कम बाळगणे टाळणे गरजेचे होते. त्याव्यतिरीक्त भाविकांचे महागडे मोबाईलही लंपास झाले असून भुरट्या चोऱ्याही झाल्याचे बोलले जात आहे.
एकंदरीत चोरट्यांनी भाविकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दिसते. ऐकीव माहितीनुसार, एका युवकाच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोनसाखळी, अन्य दोन भाविकांच्या गळ्यातील 3 व 6 तोळ्यांची सोनसाखळी, 10 ते 15 महागडे मोबाईल तसेच रोख रक्कम असा एकूण 10 ते 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज जनतेतून व्यक्त केला जात आहे. मात्र त्यास पोलीस प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. रात्री उशीरापर्यंत काही भाविक शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी बसून होते.
शिवपुराण कथेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक तालुक्यात दाखल होतील याचा अंदाज घेवून चोरटे सक्रीय झाले आहेत. गर्दीचा अंदाज घेवून चोरटे स्वतःचे हित साधत आहेत. पोलीस प्रशासनाने सोशल मिडियाच्या माध्यमातून भाविकांना कथेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत आवाहन केले होते. परंतु पोलीसांच्या आवाहनाचा काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
पं.मिश्रांच्या देशभरात अनेक ठिकाणी कथा होतात. त्यासाठी मोठी गर्दी होते. ज्या ठिकाणी गर्दी तेथे चोरट्यांची टोळी सक्रीय असावी. कथेच्या ठिकाणी होणारी गर्दी चोरट्यांसाठी मोठी संधी असाच काहीसा प्रकार पूर्वानुभवावरुन दिसून येतो. भोळ्याभाबड्या भाविकांची चोरट्यांकडून लूट होत असून पोलीस प्रशासनाने त्यावर तातडीच्या ठोस उपाययोजना शोधल्या पाहिजेत.
पुढील सात दिवस कथेनिमित्त तालुक्यात लाखो रुपयांची व्यावसायिक उलाढाल होणे अपेक्षित आहे. परंतु शोभायात्रेतच चोरट्यांची लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत असल्याचे मिश्कीलपणे जनतेतून बोलले जात आहे. तालुक्यातील छोटे-मोठे संशयित चोरटे पोलीसांनी ताब्यात घ्यावेत. जेणेकरुन तालुक्यात बाहेरच्या टोळ्या सक्रीय आहेत किंवा नाही त्याचा शोध घेण्यास मदत होईल. यापूर्वीही ज्या ज्या ठिकाणी कथा झाल्या त्या ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याचे भाविकांमधून सांगण्यात येत आहे. त्या अनुभवांवरुन पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तालुक्यात घरफोडी, दुचाकी चोरीसारख्या प्रकारांमुळे जनता त्रस्त आहे. कार्यक्रमादरम्यान बंद घरे पाहून चोरट्यांनी डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासन आणि भाविकांनीही अधिक सतर्क राहिल्यास चोरीच्या घटनांना आळा बसणे शक्य होईल.
0 Comments