Header Ads Widget

*वाळूची चोरटी वाहतूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल शिंदखेडा पोलिसांकडून शोध सुरू*


शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी:-

तालुक्यातील अलाणे गावात गौण खनिज वाळूची अवैध आणि चोरट्या पद्धतीने विक्री करण्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. यामुळे गावात आणि महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी मिना नंदलाल पवार यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता, श्रावण जिवन भिल (रा. अलाणे, ता. शिंदखेडा) हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरद्वारे अलाणे गावातील ग्रामपंचायत दरवाजाजवळून वाळूची चोरटी वाहतूक करत असताना पकडला गेला. प्राथमिक चौकशीत त्याच्याकडे मालकाचे नाव व वाळूची अधिकृत माहिती विचारली असता, त्यावेळी निलेश विश्वास पाटील (रा. अलाणे) हा तेथे हजर होऊन ट्रॅक्टर भडणे गावाच्या दिशेने पळवून नेला. हे सर्व घडत असताना महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू ठेवली, मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) तसेच महाराष्ट्र जमाबंदी महामंडळ अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींचा शोध पोलीस व महसूल यंत्रणा संयुक्तरित्या घेत आहेत. शिंदखेडा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा अवैध उपसा व विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून महसूल आणि पोलीस यंत्रणा सतर्क असतानाही काही स्थानिकांचे हात राखून हे उद्योग सुरू असल्याचे बोलले जात आहे. अलाणे परिसरातील ही कारवाई ही अशा अनेक लपवलेल्या गुन्ह्यांपैकी एक मानली जात आहे.
अवैध वाळू वाहतूक ही केवळ पर्यावरणाचा हर्हास करत नाही, तर स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती व कायदा यंत्रणेला खुले आव्हान आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करत यंत्रणा अधिक प्रभावीपणे सक्रिय होणे आवश्यक आहे, असा सूर गावकऱ्यांतून उमटतो आहे.

Post a Comment

0 Comments