Header Ads Widget

*सापांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी 'सर्प विज्ञान प्रबोधन प्रदर्शन' भरवले* *एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नागपंचमी निमित्त अभिनव उपक्रम*


शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-

सर्प म्हणजे भीती, अंधश्रद्धा आणि गैरसमजयांचे प्रतीक मानले जाते. मात्र या सर्वांच्या पलिकडे जाऊन साप ही अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाची जीवसृष्टी आहे, याची शास्त्रीय आणि सामाजिक जाणीव करून देण्यासाठी एम.एच.एस. एस. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने 'सर्प विज्ञान प्रबोधन प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष
लक्षवेधी ठरला. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सी.एस. खर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख कैलास शिंदे,प्राचार्य टी.एन. पाटील, के.बी. अहिरराव, एस.एन. नेरपगार, एल.एम. पाटील यांच्यासह शिक्षक, पर्यवेक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पोस्टर प्रदर्शनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांसाठी मांडण्यात आली होती. यामध्ये भारतातील बिनविषारी, अर्धविषारी आणि विषारी
सापांची ओळख, नाग-घोणस मण्यार-फुरसे यांच्यातील फरक, सर्पदंशानंतरचे प्राथमिक उपचार, सापांबद्दल समाजात असलेले गैरसमज व अंधश्रद्धा, तसेच सापांचे पर्यावरणीय महत्त्व यांचा समावेश होता. सर्पदंशाने मृत्यू न होता उपचाराअभावी मृत्यू होतो वास्तव पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये हे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले. सापांच्या विषापासून तयार होणाऱ्या औषधांचे महत्त्व देखील उलगडण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी सी.एस. खर्डे यांनी सापांचे जैविक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना सापांविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाल्याने भविष्यात त्यांच्यामध्ये अंधश्रद्धांबद्दल जाणीव निर्माण होईल. तर प्राचार्य टी.एन. पाटील यांनी सण-उत्सवांमागील शास्त्रीय विचार आणि निसर्गाशी नातं जपण्याचा संदेश उपस्थितांना दिला.या प्रबोधन प्रदर्शनाचा लाभ सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी घेतला. संयोजन प्रा. संदीप गिरासे, प्रा. अनिरुद्ध महानोर, प्रा. परेश शाह, प्रा. बी.पी. कढरे यांनी केले, तर प्रा. जी. के. परमार, देवेंद्र नाईक, जितेंद्र शाह, महेश पवार, महेंद्र साळुंखे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments