* शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकास योजनाच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली आहेत. शहराच्या विकासासाठी नगरपंचायत प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतीमान काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार
रावल यांनी आज दिले. शिंदखेडा नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे, नगरपंचायतीचे प्रशासक पंकज पवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, कृषी बाजार समिती सभापती नारायण पाटील, नगरपंचायतीचे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, नायब तहसीलदार विजय गोसावी, उपसभापती प्रा. आर जी खैरनार,माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम,जिल्हा चिटणीस डी. एस. गिरासे, प्रवीण माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, सुरज देसले,भाजपचे शहराध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक उदय देसले, मनोहर पाटील, विनोद पाटील, दादा मराठे, सुयोग भदाणे,गुलाब सोनवणे, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, बांधकाम अभियंता तेजस लांडे, पीएमएवाय चे अमरदीप गिरासे, लेखाधिकारी दिपलेश बागुल यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्व विभागांचा मंत्री जयकुमार रावल यांनी सविस्तर आढावा घेवून अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.
यावेळी शिंदखेडा शहरात किमान एक दिवसाआड नियमित पाणी मिळेल यासाठी नियोजन करावे. नागरिकांची मागणी लक्षात घेता नळजोडण्या तातडीने मंजूर करून द्याव्यात. तसेच शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तेथे विद्युत पंप बसविण्याची कार्यवाही करावी.
बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेताना रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. पथदिवे सुरळीत चालू ठेवावे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी नम्रतेने संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना ही त्यांनी केल्या.
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी लवकरच ९६ कोटी रुपयांचे गटारीकरण प्रकल्प मंजूर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत मंत्री जयकुमार रावल यांनी नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिंदखेडा शहर सुंदर शहर बनविण्याचा संकल्प केला असून शहराच्या भुयारी गटारीसाठी ९६ कोटी मंजूर केले असून या निधीतून शहरातील विकास कामे दर्जेदार करण्यात यावी.
यावेळी पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते शिंदखेडा शहरात ५५ लाभार्थीना शबरी घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजुर झाल्याने लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रावल म्हणाले की, शासनाने प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख पन्नास हजार एवढा निधी दिला असून या निधीतून घर ७ ते ८ महिन्यात पूर्ण करून सुंदर अशी घरे उभारण्याच्या सूचना केल्यात. यावेळी शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती व्यवस्था, आरोग्य, गटारी आणि नागरी सुविधा यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत शहरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्यात.
शिंदखेडा शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
0 Comments