धुळे : म्हशींना जास्त दूध देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या तस्करीचा एक मोठा प्रकार मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
मालेगाव येथून एका रिक्षातून या इंजेक्शनची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मालेगाव येथून एका रिक्षातून म्हशींना पानवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक इंजेक्शनची (संभाव्य ऑक्सिटोसिन) वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अवधान फाट्याजवळ सापळा रचला.
मालेगावहून धुळ्याच्या दिशेने येणारी संशयित रिक्षा दिसताच, पोलिसांनी तिला थांबवून चालक अब्दुल सलाम निसार अहमद (रा. मालेगाव) याला ताब्यात घेतले. रिक्षाची झडती घेतली असता, आतमध्ये औषधांचे बॉक्स आढळून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (FDA) सहाय्यक आयुक्त श्रीमती वर्षा महाजन यांना तातडीने पाचारण करण्यात आले.
श्रीमती वर्षा महाजन यांच्या उपस्थितीत पोलिसांनी रिक्षातील मालाची पाहणी केली असता, त्यात एकूण १० बॉक्स आढळून आले. त्या प्रत्येक बॉक्समधे १८९ बाटल्या होत्या. असा एकूण ३७,८०० रुपयांचा साठा मिळाला. हा साठा म्हशींना दूध देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संभाव्य ऑक्सिटोसिनचा असल्याचे स्पष्ट झाले.
काय आहे ऑक्सिटोसिन आणि ते इतके धोकादायक का?
ऑक्सिटोसिन हे एक संप्रेरक (Hormone) आहे, जे नैसर्गिकरित्या सस्तन प्राण्यांमध्ये स्रवते. मात्र, कृत्रिम ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांवर, विशेषतः म्हशींवर दूध वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे केला जातो. या इंजेक्शन दिलेल्या जनावरांचे दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे खालील गंभीर आजार होऊ शकतात:
स्त्रियांमध्ये वंध्यत्व आणि अनैसर्गिक गर्भपात.
लहान मुलांमध्ये कॅन्सर, कावीळ आणि पोटाचे विकार.
श्वसन आणि त्वचेशी संबंधित गंभीर आजार.
गुन्हा दाखल, तपास सुरू
हा प्रकार मानवी जीवनासाठी अत्यंत घातक असल्याने, पोलीस कॉन्स्टेबल चेतन झोळेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी रिक्षाचालक अब्दुल सलाम निसार अहमद यांच्याविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायद्याच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे करत आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
0 Comments