जळगांव- जळगांव जिल्हा पत्रकार संघातर्फे राज्यातील जेष्ठ पत्रकारांसाठी निवृत्तीपर सन्मान निधीसह विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले. रविवार दि. १७ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यवाहन अशोकआप्पा भाटीया, जिल्हाध्यक्ष प्रमोदअण्णा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांच्या शिष्टमंडळाने अजितदादांची भेट घेवून निवेदन दिले. निवेदनात जेष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधी संदर्भात केलेल्या किचकट अटी शिथिल करण्यात याव्या, निवृत्ती वेतन धारकांना मृत्यूपश्चात त्याच्या हयात पत्नीला काही रक्कम दरमहा देण्याची तजवीज करण्यात यावी, जेष्ठ पत्रकारांमधील बऱ्याच जणांचे वय झाले असल्याने व्याधीग्रस्त असून अंशतः अपंत आहेत. त्यामुळे जास्त कागदपत्रे न मागता २५ वर्षे सेवा केल्याचा पुरावा ग्राह्य धरावा व सलग सेवेचा नियम बाद करावा, जाचक अटी व नियम शिथील करावेत, किमान निवृत्ती सन्मान निधीची रक्कम वाढविण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक विचार करुन पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे शिष्टमंडळाला आश्वाशित केले. यावेळी कृषीमंत्री माणीकराव कोकाटे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री डॉ. सतिषअण्णा पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनिष जैन, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवानेते योगेश देसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments