धुळे (दि. २९ नोव्हेंबर) — कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था, धुळे यांच्या वतीने कल्याण भवन येथे “कौटुंबिक वादविवादावर कायदेशीर सल्ला” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजकार्यकर्ते श्री. हरिश्चंद्र रेंडे होते.
ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. बापूसाहेब एस. एम. पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “कुटुंबात नाती जपताना अहंकार, मोह किंवा द्वेष यांसारखी भावना दूर ठेवून प्रेम, आदर आणि समजूतदारी जोपासली तर वादविवादांना वावच राहत नाही. परस्परांतील संवादाचा अभाव आणि अहंकारामुळेच कुटुंबात तणाव निर्माण होतो आणि त्याचे रूपांतर नंतर कायदेशीर वादात होते.”
त्यांनी सेवानिवृत्त वर्गाचे विशेष मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की,
“सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेली आर्थिक रक्कम ही आयुष्याच्या उर्वरित काळातील सुरक्षाकवच असते. मुलांच्या आग्रहामुळे किंवा त्यांच्या भवितव्यासाठी स्थावर मालमत्तेसाठी सर्व बचत खर्च करून पुन्हा कर्जबाजारी होणे किंवा परावलंबी होणे टाळावे. विवेकपूर्ण नियोजन केल्यास उर्वरित वयोमानात कोणत्याही संकटाला तोंड देता येते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अविनाश मोरे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. बी. सोनार यांनी केले.
या कार्यक्रमाला इंजी. ज्ञानेश्वर पाटील, श्री. राजेंद्र माळी, श्री. मिलिंद मिस्त्री, श्री. देविदास शिरुडे, श्री. अरुण जोशी, श्री. सुधीर पोतदार, श्री. ललित कासार, श्री. वसंत गायकवाड, आर. एम. पाटील, सुरेश पवार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments