पाष्टे, मुंडावर, परिसरात आलेल्या अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले आहे. रात्रंदिवस घाम गाळून
वाढवलेली हरभरा व दादर पिके क्षणात जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
काढणीच्या तोंडावर असलेले पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे पडले, तर पावसाने सर्वस्व हिरावून नेले. लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पीक नष्ट झाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात पडलेली पिके पाहून “आता जगायचे कसे?” असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे.
आधीच कर्जबाजारीपणा, वाढती महागाई आणि उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने पूर्णपणे खचून गेला आहे. या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलता दाखवून तात्काळ पंचनामा करावा व बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी आर्त मागणी पाष्टे परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments