Header Ads Widget

*शिंदखेडा भूमी अभिलेख कार्यालयात पूर्णवेळ उपअधीक्षकांची नियुक्ती* 👉 *उपनगराध्यक्ष उदय देसले, सभापती व नगरसेवकांच्या* *पाठपुराव्याला यश*



शिंदखेडा  (यादवराव सावंत,प्रतिनिधी) तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयातील अधिकारी रिक्ततेमुळे रखडलेली शेकडो प्रकरणे, नागरिकांचे वाढते हेलपाटे आणि प्रशासनातील संथ गती या प्रश्नांवर अखेर ठोस कार्यवाहीची नांदी झाली आहे. उपनगराध्यक्ष उदय देसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व सभापती व नगरसेवकांनी पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याकडे केलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत शासन स्तरावर आदेश देण्यात आले आणि अवघ्या आठवडाभरातच शिंदखेडा भूमी अभिलेख कार्यालयासाठी पूर्णवेळ उप अधीक्षक भूमी अभिलेख (पदमोचक अधिकारी) म्हणून नितीन आटाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
नितीन आटाळे यांनी दि. २९ जुलै रोजी पदभार स्वीकारला असून त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या वारस नोंदी, जमिनीची मोजणी, पोटहिस्सा, मालकी हक्क, नकाशा दुरुस्ती आदी प्रकरणांच्या निपटाऱ्याला आता गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व सभापती व नगरसेवक यांनी संयुक्त निवेदनाद्वारे शिंदखेडा कार्यालयात नियमित व पूर्णवेळ

 *पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे नागरिकांना दिलासा* 

अधिकारी नियुक्त करण्याची जोरदार मागणी केली होती.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात सातत्याने होणारा विलंब हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती व्यवहार आणि मालमत्ता हक्कांशी संबंधित संवेदनशील विषय बनला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दाखविलेली तत्परता ही केवळ आदेशापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष नियुक्तीपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होईल, नागरिकांचे वारंवार होणारे हेलपाटे थांबतील आणि भूमी अभिलेख कार्यालयावरील जनतेचा विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा शिंदखेडा तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाबद्दल नागरिकांनी पालकमंत्री ना. जयकुमार रावल, भाजपा पदाधिकारी तसेच निवेदनासाठी पुढाकार घेणारे उपनगराध्यक्ष उदय देसले, सर्वसभापती व नगरसेवक यांचे आभार मानले आहेत. अनेक नागरिकांनी याला पाठपुराव्याच्या राजकारणापेक्षा लोककारणाला मिळालेले यश अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments