Header Ads Widget

वारुड–पाष्टे–म्हळसर रस्ता बनला मृत्यूचा सापळा!खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास; अधिकारी-पुढाऱ्यांचे दुर्लक्ष, संतापाचा उद्रेक

पाष्टे : वारुड येथील लोटनदादा मंदिरापासून पाष्टेमार्गे म्हळसरपर्यंतचा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी डांबर उखडले असून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेला डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी रस्ता अरुंद व धोकादायक झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत असून, पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर निश्चित करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

दरम्यान, रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
खड्डे बुजवा, अन्यथा रस्त्यावर उतरू!’ — नागरिकांचा इशारा

Post a Comment

0 Comments