तांदळी हे अमळनेर तालुक्यातील पांझरा मायच्या तिरी वसलेले आदर्श गाव. येथे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. सर्वांचीच शेती संस्कृतीशी नाळ जुळलेली. शेतीत राबत असतांनाच जिल्हा परिषद शाळेतून का असेना? आपली बालके शिकून मोठे साहेब व्हावेत असे त्यांचे स्वप्न असते. तांदळीच्या जि.प. शाळेत शिकलेली काही मुले उच्चपदस्थ अधिकारीही झाले आहेत. आज या शाळेतील विद्यार्थिनी भाग्यश्री महेंद्र तिरमले हिने चौथी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश मिळविले. भाग्यश्रीस मार्गदर्शन करणारे तिचे गुरुवर्य सुधीर चौधरी गुरुजी, शांताराम बोरसे गुरुजी आणि पालक यांचेही अभिनंदन आणि कौतुक. देशाचे भवितव्य शाळेच्या वर्गातच घडते. आज ज्यांचे पुण्यस्मरण होत आहे ते माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अब्दुल कलाम अशी अनेक उदाहरणे आहेत. आज एका वाटसरुने मला तांदळीच्या जिर्ण शाळेचा फोटो पाठविला. तांदळीच्या शाळेत माझे वडील धनगर गुरुजी हे एक तप शिक्षक होते. या गावातूनच मी बेटावदच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यामुळे मला तांदळी विषयी जिव्हाळा आहे. मी स्वत:ला अनिवासी तांदळीकर समजतो. अल्पशा पावसातही जिर्ण अवस्थेत छत गळते अशा अवस्थेत चिमुकले कसे शिक्षण घेत असतील? आणि त्यांना घडविणाऱ्या गुरुजनांना शिकवतांना किती कसरत करावी लागत असेल? सर्वदूर बिचाऱ्या शिक्षक वर्गाची अवस्था ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशीच आहे. सर्वशिक्षा अभियानाचा ‘डांगोरा’ सर्वदूर पिटला जातो. सर्वच राज्यभरातील शिक्षकांनी तरी काय करावे? त्यांच्यावर बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामाचा डोंगराएवढा भार. त्यांनी मुलांना शिकवावे कधी? मुलांना आरोग्य आणि सुविधांचा अभाव. मुले धडपडीने शिकली तरी भवितव्य काय? नोकरी नाही. बेकारी ‘आ’ वासून उभी राहते. मग मा. न्यायव्यवस्थेने दिलेल्या उपाधी वरून ‘जेन-झी’ चे हेच तरुण ‘कॉक्रोच’ बनून राज्यकर्त्यांना ‘दे धक्का’ देत सर्वशक्तीशाली सरकारलाही झुकावे लागले हे ‘जंतर-मंतर’च्या घटनेवरुन सिद्ध झाले आहे.
- गो.पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे
94227 95910
****
0 Comments