शिंदखेडा : शिक्षण विभाग पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ तसेच विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा श्री स्वामी समर्थ हायस्कूल, शिंदखेडा येथे उत्साहात संपन्न झाला. यावर्षीच्या विज्ञान मेळाव्याचा विषय “ऊर्जा : संभाव्यता व आव्हाने” हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री चंद्रकिरण शिवदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री डी. एस. सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष श्री एम. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री जे. डी. भदाणे, जिल्हा विज्ञान संघ सचिव श्री एस. एस. गोसावी, जिल्हा उपक्रम प्रमुख श्री आर. ए. चित्ते, तालुका अध्यक्ष श्री सुधाकर माळी, तालुका सचिव श्री ए. टी. पाटील तसेच गट समन्वयक श्री गुलाब सोनवणे यांच्या सह तालुक्यातील विज्ञान शिक्षक व विज्ञान मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सन २०२६-२७ मध्ये सेवा निवृत्त झालेल्या आर डी एम पी च्या शिक्षिका श्रीमती भावे मॅडम तसेच आश्रम शाळा वर्षी येथे मुख्याध्यापकपदी नियुक्त झालेले विज्ञान शिक्षक श्री सुहास पाटील यांचा गटशिक्षणाधिकारी श्री चंद्रकिरण शिवदे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
या विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, पाष्टे येथील कुमारी मयुरी लक्ष्मण जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिंदखेडा येथील प्रशांत प्रकाश चौधरी याने द्वितीय क्रमांक मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिके एन. डी. मराठी हायस्कूल , शिंदखेडा येथील दर्शन दिनेश पवार आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, दोंडाईचा येथील स्पंदन प्रकाश आगळे यांना देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री सुहास पाटील व श्री आर. ए. चित्ते यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए. टी. पाटील यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री सुधाकर माळी यांनी मानले.
“ऊर्जा : संभाव्यता व आव्हाने” या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, ऊर्जेचे विविध स्रोत, भविष्यातील ऊर्जेच्या गरजा आणि त्यासमोरील आव्हाने याबाबत आपले विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारा हा विज्ञान मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
0 Comments