Header Ads Widget

स्वच्छतेच्या सेवेला सलाम! ‘आधुनिक गाडगेबाबा’ भगवान सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ध्वजारोहणाचा मान एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्तीला नव्हे, तर गावाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या एका सामान्य माणसाला देण्यात आल्याने पाष्टे करांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
पाष्टे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पाष्टे (ता. शिंदखेडा) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. मात्र यंदाच्या ध्वजारोहण सोहळ्याने एक वेगळीच भावनिक उंची गाठली. गावाच्या स्वच्छतेसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता वर्षानुवर्षे निःस्वार्थ सेवा करणारे स्वच्छतादूत भगवान सोनवणे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अर्जुन ठाकरे होते. पाष्टे गावाचा दर्शनी भाग असलेल्या बसस्थानक परिसरासह ग्रामपंचायत व देवालय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी भगवान सोनवणे गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहेत. कोणतेही वेतन किंवा मोबदला न घेता गावातील कचरा व घाण साफ करण्याचे सामाजिक कार्य ते निष्ठेने करीत आहेत.
विशेष म्हणजे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी लागणारी तिरडी सजविण्याचे सेवाकार्यही ते निःस्वार्थपणे करतात. प्रसिद्धीची अपेक्षा नाही, मोबदल्याची अपेक्षा नाही; केवळ गाव आपले आहे आणि गाव स्वच्छ राहिले पाहिजे, या भावनेतून त्यांची ही सेवा सुरू आहे.
भगवान सोनवणे यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीष पाटील, व्हा. चेअरमन भागवत महाजन, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन भास्कर पाटील, व्हा. चेअरमन रोकडे सर, माजी सरपंच मधुकर शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या पूनम ठाकरे यांच्यासह संचालक मंडळाने त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान दिला.
एक सर्वसामान्य नागरिक असूनही आपल्या निःस्वार्थ सेवेतून संपूर्ण गावाच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या भगवान सोनवणे यांना ‘आधुनिक काळातील गाडगेबाबा’ म्हणून गौरविण्यात येत आहे. त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकताना अनेक पाष्टेकर नागरिकांनी हा क्षण डोळे भरून पाहिला.

Post a Comment

0 Comments