Header Ads Widget

*‘बुराई नदी वाचवा,अवैध वाळू वाहतूक थांबवा!’; पत्रकार गिरासे यांचे १३ ऑक्टोबरला आमरण उपोषण* *अवैध वाळू वाहतूक उपशाविरोधात अहिंसक आंदोलन; प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी*


शिंदखेडा प्रतिनिधी : बुराई नदीपात्रातील कथित अवैध वाळू वाहतूक व अनधिकृत वाळू उपसा थांबविण्याच्या मागणीसाठी साप्ताहिक बातमी वेधचे संपादक तथा राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त पत्रकार महेंद्रसिंग गिरासे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
गिरासे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार,१३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अलाने,ता. शिंदखेडा येथील बुराई नदीपात्रात अहिंसक मार्गाने आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

बुराई नदीपात्रातील कथित अवैध वाळू वाहतूक व उपशावर प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवावे, नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी गिरासे यांची प्रमुख मागणी आहे.

या संदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षक, शिंदखेडा यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी प्रशासनाने बुराई नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“बुराई नदी वाचवा... अवैध वाळू वाहतूक थांबवा!” या भूमिकेतून हे आंदोलन करण्यात येणार असून, प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन नदीपात्राचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत,अशी अपेक्षा गिरासे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नदीपात्रातील वाळू उपसा व वाहतूक कायदेशीर परवानगीने होत आहे किंवा नाही, याची अधिकृत तपासणी करूनच पुढील कारवाई निश्चित करावी, अशीही भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments