काल दि. 12 ऑगस्ट रोजी काही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली बातमी आहे. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर सांगवी शिवारातील प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे की, जवळच काळापाणी आदिवासी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका किराणा दुकानाचे शटर तोडून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तिघा दरोडेखोरांना ग्रामस्थांनी जंगलात पाठलाग करून दरोडेखोरांना ओढत आणीत पोलीसांच्या स्वाधीन केले. ग्रामस्थ आदिवासी बांधवांच्या धाडसाचे नक्कीच कौतुक आहे. मात्र त्याच बातमीत वृत्तपत्रात पोलीस स्टेशनला पकडलेल्या दरोडेखोरांसोबत फोटो प्रसिद्ध झाले. पोलीस बांधवांच्या फोटोत दरोडेखोरांना पकडणाऱ्या आदिवासींना सोबत घेतले असते तर काय अडचण होती? त्यांचीही अभिमानाने छाती फुगली असती. पण या फुकटच्या श्रेयाची चोरी आणि उचलेगिरी कशासाठी? पोलीस बांधवांनी ज्यांचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. एव्हढी धुळफेक कशासाठी? मांजर चोरून दूध पित असली तरी ती आपल्याला दिसते. तसाच वाचकही जागरुक आहे. फोटोतील बनवेगिरी लगेच लक्षात येते. अहिराणी भाषेतील म्हणीप्रमाणे ‘‘आयजीना जीववर बायजी उदार आणि सासुना जीववर जवाई उदार असे होऊ नये’’ मेहनत ज्यांनी केली त्यांना अंडे मिळालेच पाहिजे, मध्येच सुभानने अंडे गिळंकृत करणे न्यायाला धरून नाही.
- गो. पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे
मो. 94227 95910
0 Comments