शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- दहा वर्ष उलटूनही शिंदखेडा शहरासाठी असलेली २१ कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. आजही अनेक भागात जुन्या पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात येत आहे. १०० टक्के रहिवाशांना नवीन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा, स्वातंत्र्यदिनी नगरपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांनी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सुमारे दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अथक प्रयत्न करून शिंदखेडा शहराच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्न सुटावा म्हणून २१ कोटी खर्चाची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेचे काम सुरू होण्यास जवळपास दहा वर्ष उलटूनही शिंदखेडा शहरवासी यांना नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत नाही. आजही अनेक भागात १९७५ पासूनच्या जुन्या
पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात येत आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष व सभागृह नेत्यांनी संबंधित ठेकेदार व जीवन प्राधिकरण धुळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवठा करूनही अद्याप अनेक घरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे नळाद्वारे पाणी दिले जात नाही. पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी या योजनेचे काम वीस दिवसात पूर्ण करून संपूर्ण शहराला नवीन योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु, आजपर्यंत परिस्थिती जैसे थे आहे.
निवेदनाची दखल घेऊन १०० टक्के लोकांना नवीन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा, स्वातंत्र्यदिनी नगरपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष माळी, चंद्रकांत गोदवाणी, लक्ष्मीकांत माळी, दिनेश सूर्यवंशी, राजू पहाडी, शंकर भिल, जयवंत राजपूत आदींच्या सह्या आहेत.
0 Comments