Header Ads Widget

शिंदखेडा तालूक्यातील चिलाणे गावाजवळ 16 जिवंत काडतुस व तीन गावठी कट्ट्यांसह राजस्थानातील शस्त्र तस्कर जाळ्यात



शिंदखेडा : मध्यप्रदेशातून शस्त्रांची खरेदी करून तस्कर दोंडाईचामार्गे राजस्थानात जात असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्यानंतर शिंदखेडागावाजवळील चिलाणे गावाजवळ सापळा रचण्यात आला. संशयीत चारचाकी वाहन आल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यातून तीन गावठी कट्टे, 16 जिवंत काडतूस व एक मॅगझीन जप्त करण्यात आली. पोलिसांनी पाहताच संशयीतांनी पळ काढला मात्र पाठलाग करून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
राजस्थानातील संशयीत मध्यप्रदेशातून शस्त्र खरेदी करून दोंडाईचामार्गे राजस्थानात जाणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने सापळा रचला होता.

शिंदखेडा गावाजवळील चिलाणे गावाजवळ शुक्रवारी पहाटे 6.30 वाजता स्कॉर्पिओ (जी.जे. 08 बी.बी. 5069) पथकाला दिसल्यानंतर तिला अडवण्यात आले. यावेळी पोलिसांना पाहताच दोन संशयीत पसार झाले मात्र त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी कंवरराम केसाराम जाट (27, रा.135 अनादरी गोदारी की ढांणी, कोशले की ढांणी, तहसील गुडामालानी, जि.बाडमेर, राजस्थासन) व विक्रमसिंग भंवरसिंग राजपूत (21, रा.राजपूतो की ढांणी, साबरसर तहसील शेरगढ, जि.जोधपूर, राजस्थान) यांना अटक करण्यात आले

ड्रायव्हर सीटखाली लपवले शस्त्र
पोलिसांनी दोघा संशयीताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर मॅकेनिकच्या मदतीने स्कॉर्पिओची बारकाईने झडती घेतली असता चालकाच्या शीटखाली चेसीसमध्ये तयार करण्यात आलेल्या कप्प्यात तीन गावठी पिस्तूले, 16 जिवंत काडतुसे व एक मॅगझीन लपवल्याचे दिसून आले. 44 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल व 12 हजार रुपये किंमतीचे एक पिस्टल तसेच तीन हजार हजार रुपये किंमतीचे मॅगझीन व 16 हजार रुपये किंमतीचे 16 जिवंत काडतूस जप्त केल्याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीदेखील आरोपींनी राजस्थानात शस्त्र तस्करी केल्याचा संशय असून शस्त्र विक्री करणार्‍यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवत, योगेश राऊत, सुशांत वळवी, प्रकाश सोनार, संजय पाटील, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, चालक कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.

Copy

Post a Comment

0 Comments