धुळे : एकीकडे आस्मानी संकटावर शेतकरी कसा बसा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र पेरणी केलेले बियाणेच बोगस निघाल्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीमध्ये करावे तरी काय असा प्रश्न कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.
तब्बल दहा एकरामध्ये पेरलेले टरबुजाच महागडे बियाणे उगवलेच नसल्यामुळे या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मायबाप सरकारने शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत व फसवणूक झालेल्या या शेतकऱ्याला दिलासा द्यावा; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.
नुसते बियाणे ४५ हजाराचे
धुळे तालुक्यातील ढंढाने याशिवारात किशोर दगा पाटील यांची दहा एकर शेती असून या शेतात पाटील यांनी तब्बल ३० पॅकेट टरबूजाचे महागडे बियाणे पेरले. या बियाण्यावरच पाटील यांचा तब्बल पंचेचाळीस हजार रुपये इतका खर्च झाला. परंतु यापैकी फक्त १५ ते २० टक्केच बियाणे शेतात उतरले. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे आणि यामुळेच मल्चिंग करण्याशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर राहिले नाही. म्हणून पाटील यांनी दहा एकर क्षेत्रात टरबूज बियाणांची लागवड करण्याआधी मल्चिंग केले. तसेच ठिबक देखील केले. त्यापाठोपाठ खत, मजुरी असा एकूण साडेतीन ते चार लाखांपर्यंत खर्च झाला. एवढे करून देखील बियाणे बोगस निघाल्यामुळे पाटील यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पाटील यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून आता हे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. बियाणे बोगस निघाल्यामुळे या पिकाच्या भरवशावर सावकारी कर्ज घेतले; ते बियाणे बोगस निघाल्यामुळे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे या शेतकऱ्याने बोलून दाखविले. याबाबत संबंधित अभियानाच्या कंपनीशी संपर्क करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. परंतु या कंपनीतर्फे देखील शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तर दिली जात असल्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
0 Comments