धुळे ः महसूल विभागाची (Revenue Department) कार्यपध्दती लक्षात घेत शहरात वाळू तस्कर सक्रिय झाले आहेत. बहुसंख्य महसूल कर्मचारी सकाळी अकरापासून कार्यरत होतात. त्यांची ही मानसिकता लक्षात घेत वाळू तस्करांनी (Sand smuggler) आपला कार्यभार सकाळी सहा ते अकरापर्यंत उरकण्यास सुरवात केली आहे. शहरात पंचवटीजवळ पांझरा नदीपात्रातून पहाटे वाळूची तस्करी सुरू होते.
उपशामुळे तेथे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. या ठिकाणा जवळच नागरी वसाहत आहे.
जिल्ह्यातून तापी, पांझरा, बुराई, बोरी अशा अनेक नद्या वाहतात. नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. काही वर्षांपासून नागरिक सजग झाल्यामुळे नदीकाठावरील वाळूचा उपसा करण्यास विरोध होऊ लागला. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी वाळू उपसा करण्यास परवानगी दिली जाते. नदीपात्रातील वाळू आणि डोंगरमाथ्यावरील गौण खनिजाची जबाबदारी तलाठी, मंडलाधिकाऱ्यांची असते. तलाठी आणि मंडलाधिकारी सकाळी अकरानंतर सक्रिय होतात. याच स्थितीचा वाळू तस्करांनी गैरफायदा उठविण्यास सुरवात केली आहे.
शहरापासून दूर नव्हे, तर शहराच्या कार्यक्षेत्रातूनच वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. देवपूरमध्ये मोठ्या पुलाजवळच सकाळी सहा ते अकरा या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणाजवळ कष्टकऱ्यांची वसाहत आहे. तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्यामुळे या क्षेत्रात चार ते पाच फूट खोलीचे खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या पावसामुळे नदीपात्रातून काही प्रमाणात पाणी वाहत आहे. वाळू तस्करांनी केलेल्या खड्ढ्यांमध्ये पाणी साचू लागले आहे. नदीकाठावरील कष्टकऱ्यांच्या वसाहतीतील मुले नदीपात्रात खेळण्यास जातात. मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमध्ये लहान मुले पडून दुर्घटना होऊ शकते. वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर देवपूर पोलिस ठाणे आहे. हा प्रश्न महसूल विभागाच्या अखत्यारित आहे, असे सांगत पोलिस उद्भवणाऱ्या स्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

0 Comments