Header Ads Widget

घरनं झायं थोडं, याहीनी धाडं घोडं



धुळे- साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरी समोरील विद्यावर्धिनी लगत जाणार्‍या रस्त्यावर मलेरियाऑफीस पर्यंत रस्त्याची भयानक अवस्था झाली असून खाच खळगे, डबके, केरकचरा पार करीत वाटचाल करावी लागते. पालिकेची एवढी कृपा (!) असतांनाही मध्येच एका मोबाईल


 कंपनीने मोबाईलच्या भावी सुविधांसाठी (!) ठिकठिकाणी खांब गाडणे सुरु केले आहे. त्यातच खांब गाडून झाल्यानंतरही त्यांनी खोदलेल्या खड्डयांचा मातीचा ढीग तसाच राहु दिल्यामुळे पादचारी, वाहन चालकांना कसरत करावी लागते. आमच्या घरच्या पालिका यंत्रणेचा कारभार त्यांचे परिसरातील कर्मचारी धडपड करीत नागरीकांच्या आरोग्याची, सोय सुविधांची काळजी वाहत असतांना मोबाईल कंपनीचा हा उद्योग म्हणजे परिसरातील नागरीकांसाठी अहिराणीत सांगायचं म्हणजे, ‘घरनं झायं थोडं, याहीनी धाडं घोडं’
परवाचं एक दुचाकी वाहन चालकाची लक्ष्मीनारायण मंदीराच्या रस्त्याने सप्तश्रृंगी मंदीराजवळ खूप दिवसापासून लीक झालेल्या व्हॉल्वचा खोदून ठेवलेला खड्डा वळण घेत


 असतांना मोबाईल कंपनीचा खड्डयाजवळील पडून असलेल्या मातीच्या ढिगार्‍याजवळ गाडी स्लिप झाली. मातीने माखला, अवयव सुरक्षित राहिले (ही कृपा समजा) आणि तो मनातल्या मनात पुटपुटला पण ती  शिवी होती की ओवी (!) माहित नाही. खड्डे खोदणार्‍या बिचार्‍या एका मजुराला विचारले हे कसले काम आहे? त्यावर तो एव्हढेच म्हणाला,  “हाई मोबाईल कंपनीनं ‘हाय फाय’ करता शे’’ पण त्या ‘हाय फाय’ खड्ड्यातील मातीचे ‘हायफाय’ ढीग खांब रोऊन झाल्यावर  उचलण्याची जबाबदारी कुणाची? आम जनतेचा रोषाला मात्र बिचार्‍या आरोग्य विभाग व आरोग्य कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागते.
विद्यावर्धिनी प्राध्यापक वसाहत ते मलेरिया ऑफीस पर्यंत गटारीतले पाणी रस्त्यावर येते की रस्त्याचे पाणी गटारीत जाते, गटार रस्त्यात आहे की रस्ता गटारीत? सर्वच गोंधळ आहे. कदाचित निसर्गाची थोडी फार कृपा होत असल्याने पडणार्‍या पाऊसालाही दोष देता येईल. प्रत्येक वेळी पालिकेलाच दोषी देणे बरे नव्हे! मलेरिया (हिवताप) ऑफीस समोरील नाल्यालगतची ‘आवो जावो कचराकुंडी’ आणि तिच्या दुर्गंधीचा येणारे-जाणारे आणि सहन करणारे परिसरातील सहनशील रहिवाशांना साष्टांग दंडवतच घालावे लागतील. शेजारीच मलेरिया ऑफीस जवळ असल्याने कचरा कुंडीतील डासांमुळे हिवताप होणार नाही त्यामुळे परिसरातील नागरीकही निर्धास्त (!) आहेत.
एकूण सर्वच बाबतीत जनता बिचारी मुकीच आहे. जनता कुणाला बोलणार? किती वेळा बोलणार? आणि काय बोलणार? आणि ज्याला बोलायचे त्याला समजणार किती, ते एैकणार किती? त्यांना सांगितलेले ऐकु आले तर अंमलात आणणार तरी किती? पालिका आणि मोबाईल दोन्ही यंत्रणांचे एकमेकांशी काही देणे घेणे नाही असेच या प्रकारावरून दिसते. नेते, समाज सेवक, पालिकाचे कारभारी सांगतात,  “काही अडचण असेल तर आम्हाला सांगा’’ ही ठरलेली सबब म्हणजे पाहुण्यांच्या हाताने साप मारून घेण्याचा प्रकार होय. या भागातून पालिकेचे असंख्य कारभारी या रस्त्यावरून रोज ये-जा करतात. कृपया त्यांनी आपले डोळे उघडे ठेवून ‘आँखो देखा हाल’ पहावेत व संबंधित मोबाईल कंपनीला जाब विचारावा अशी विनंती राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ साथी गो. पि. लांडगे यांनी केली आहे.

- गो. पि. लांडगे, ज्येष्ठ राष्ट्र सेवा दल साथी, धुळे.
 
*******

Post a Comment

0 Comments