कापडणे : धुळे जिल्ह्यात सुमारे शंभरावर पोलिसपाटलांची (Police patil) पदे रिक्त (Vacancies) आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी पोलिसपाटील संघटनेने (police patil organization) जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) केली. संघटनेने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा व धुळे उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शंभरावर गावांची पोलिसपाटील ही पदे रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलिसपाटलांना त्या गावाचे पद सांभाळावे लागत आहे.
भरतीप्रक्रिया केव्हा?
ज्या पोलिसपाटलांनी राजीनामा दिला आहे, तेथे नवीन पदे भरावीत आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकारी शर्मा व प्रांताधिकारी धोडमिसे यांनी पोलिसपाटील रिक्त पदांची लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करू, असे आश्वासन दिले, अशी माहिती संघटनेने दिली. दरम्यान, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण देवरे, साक्री तालुकाध्यक्ष रवींद्र बेडसे, उपाध्यक्ष आंनदा पाटील, धुळे तालुका प्रभारी अध्यक्ष संदेश पाटील, धुळे तालुका महिलाध्यक्षा भारती अहिरे, सदस्य आकाश भदाणे, संदीप पाटील, अतुल भामरे आदी उपस्थित होते.
कापडणेला 'नो पोलिसपाटील'
कापडणे हे धुळे जिल्ह्यातील मोठ्या गावांपैकी एक गाव आहे. वीस हजारांवर लोकवस्तीचा गाडा दहा वर्षांपासून पोलिसपाटीलविना सुरूच आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल हा कारभार विनामोबदला सांभाळत आहेत. मध्यंतरी पोलिसपाटील भरती झाली. त्या वेळीही येथे हे पद भरले गेले नाही. आता तरी हे पद भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

0 Comments