मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात मुसळधार पावसाचं वातावरण तयार झालं आहे.
सध्या पूर्व अफगाणिस्तान आणि शेजारील पाकिस्तानवरील पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे आता 28 आणि 29 डिसेंबर रोजी राज्यात मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपात देखील पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
28 डिसेंबर रोजी म्हणजेच येत्या मंगळवारी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
या सात जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी गारपीठ देखील होण्याची शक्यता आहे.
धुळे, जळगाव, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सात जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, वातावरण ढगाळ राहणार आहे.
29 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, 27 ते 29 डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

0 Comments