Header Ads Widget

चोरीचे वाहन तोडी केंद्र उध्वस्त कां होत नाही?




*धुळे,* मालेगाव ही गावे इतर अनेकवीध कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. जर कुणा व्यक्तिला जुन्या कारचे, ट्रकचे, ट्रालाचे,  मोटार सायकलचे स्पेअर पार्टस , इंजिन, मशिनरी , टायर वगैरे हवे असेल तर त्याच्याकडून प्राधान्याने धुळे किंवा मालेगाव मध्ये शोध घेतला जातो . त्यांना  गाड्यांचे असे  जुने स्पेअर पार्टस् सहज उपलब्धही होतात . कुठून देत असेल हा ऑटो पार्टसचा एवढा मोठा जुना माल ?  हा प्रश्न अनेकांना सतत हैराण करीत असतो . देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांची परवा उत्तर प्रदेशात शाहजहाँपूर  येथे एक प्रचार सभा झाली . त्या सभेत त्यांनी मेरठ मधल्या अशाच एका सोतीगंज बाजाराचे उदाहरण दिले . मेरठ मधील सोतीगंज ही उत्तर भारतात वाहनांच्या जुन्या स्पेअर पार्टसची सर्वात मोठी बाजारपेठ आहे . हव्या त्या भारीत भारी , व्हिंटेज , आवूट ऑफ प्रोडक्शन गाड्या व कुठेच मिळणार नाहित असे विविध वाहनांचे सुटे पार्टस या सोतीगंज मध्ये हमखास मिळतात . अशी त्याची ख्याती आहे . पंतप्रधानांनी सांगितले, की  'देशात कुठेही कुठलेही वाहन चोरी झाले , की ते तोडून पार्ट - पार्ट मोकळे करण्यासाठी या सोतीगंज मार्केट मध्ये येत असे. '  विशेष म्हणजे ऑन डिमांडही वाहन चोरून ते स्पेअर पार्टस येथील  मंडळी उपलब्ध करून देत असत. तीस वर्षे हे मार्केट चोरीच्या वाहनांच्या स्पेअर पार्टसनी फुललेले होते . संसदेतही या मार्केटचा विषय गाजला होता . ' उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी ना . योगी आदित्य नाथ आले व प्रशासनाच्या मदतीने हे चोरीच्या वाहन स्पेअर पार्टसचे मर्केट ध्वस्त झाले.'  
     या चोरीच्या वाहन स्पेअर पार्टस मार्केटवर मग मीडिया वाल्यांनी सविस्तर रिपोर्ट तयार केला . गेली तीस वर्ष येथे हा धंदा सुरु होता . अनेक पोलिस अधिकारी आले आणि गेले . सर्वांना या मंडळींनी खिशात घातले होते . मात्र  ना. योगींनी कडक धोरण राबविले . मेरठला पोलिस अधिकारी एस. एस . पी . प्रभाकर चौधरी आले . त्यांनी मोहिम राबविली आणि हे धंदे बंद पाडले . यात त्यांनी ७० कोटीची संपत्ती जप्त केली.  हा माल त्यांनी आणला कुठून ? म्हणून नोटीसा दिल्या . या जागांचे मालक कोण ? दुकानदार कोण ? याबाबतही सीआरपीसी अंतर्गत त्यांनी नोटीसा बजावल्या . शिवाय या कारवाईत  त्यांना ६२   कबाडी  हिस्ट्री शिटर सापडले . १७० पोलिस कर्मचार्‍यांवरही त्यांनी कारवाई केली . या करावाईत चक्क एका पोलिस निरिक्षकास फरार व्हावे लागले . 
      जे मेरठच्या सोतीगंज मध्ये परिपूर्ण कारवाईने शक्य झाले आहे , ते धुळे आणि मालेगाव मध्ये खास करून धुळ्यात कां शक्य होत नाही ? हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे.  संपूर्ण महाराष्ट्रातील मुंबई ,नागपूर , पूणे पासून थेट नाशिक , औरंगाबाद , बीड , सोलापूर , अकोला , अमरावती,  रत्नागरी पर्यंत आणि इंदोर , सुरत बडोदा, अहमदाबाद  पर्यंतच्या वाहन धारकांचा हा चिंतेचा विषय आहे . सोतीगंज प्रमाणेच धुळे हे चोरीची वाहने काही तासातच पार्टस् पार्टस् मोकळे करण्यासाठी प्रसिद्ध आहे . संपूर्ण महाराष्ट्र ,  मध्यप्रदेश , गुजरात , राजस्थान , कर्नाटक आदी लगतच्या राज्यात कुणाची कार , जीप ,  ट्रक , टॅन्कर , ट्राला , जेसीबी ,  मोटार सायकल आदी वाहनांची चोरी झाली, की तो ताबडतोबीने धुळ्याकडेच धाव घेत असतो . त्याचा एक प्रतिनिधी धुळ्यापर्यंतचे सर्व टोल प्लाझा वरील सीसी टीव्ही पडताळणी करीतच धुळ्यापर्यंत पोहोचत असतो . मध्यंतरी मुंबईत भाड्याने इनोव्हा कार घेवून धुळ्याच्या अगोदर त्या कार चालकास मारठोक करून रस्त्यात फेकून देण्यात येत असे व कार गायब करण्यात येत असे . हे प्रकार तेव्हा खूप गाजले आहेत.  धुळे हे चार हायवे वरील गाव आहे . येथे ट्रकांमधून ड्रायव्हरच्या संगनमताने हवी ती वस्तू चोरून उतरविणारे अनेक काटेवाले आहेत . ट्रक धंध्यात देशभरात धुळ्याची यासाठी देखील ख्याती आहे . तत्कालीन कलेक्टर सिताराम कुंटे यांनी या रॅकेटवर  बेसिक कारवाई केली होती . त्यानंतर मात्र कारवाई नाही.  धुळ्यात मालेगाव रोड , डायव्हर्शन हायवे व लगतच्या परिसरात अर्धा  , एक , दोन एकर जागेवर उभे पत्रे लावलेली 'ओपन टू  स्काय '  मोठमोठी गोदामे असतात. त्याच्या  मोठ्या गेट मधून मोठ मोठे दोन चार ट्रक, टॅन्कर आत गेले तरी बाहेरून काहीच दिसत नाही . आत मध्ये अशी  चोरीची वाहने  काही तासातच तोडली जातात किंवा चोरून ट्रकांमधून विविध प्रकारचा माल उतरविला जातो. चोरीच्या तोडलेल्या वाहनाचे स्पेअर पार्टस लागलीच विविध भागात रवाना केले जातात . सोतीगंज येथील चोरीच्या वाहन तोडीचे मार्केट उध्वस्त होते तर धुळ्यातील कां नाही ? हा प्रश्न आता नागरिकांना सतावतो आहे .
दै.पथदर्शी, साभार

Post a Comment

0 Comments