Header Ads Widget

बनावट कागदपत्रांच्या मदतीने बायोडिझेलची तस्करी



धुळे : 

बनावट कागदपत्रांच्या मदतीने बायोडिझेलची तस्करी करण्याचा प्रकार धुळे तालुका पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी कंपनीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 22 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या महामार्गावरील मुकटी शिवारातील हॉटेल आनंद समोर वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ( जीजे 31 डी 1936 ) क्रमांकाचा टँकर थांबवून चालकाकडून कागदपत्रांची मागणी केली. यावरून चालकाने पोलीस पथकाला दिशाभूल करण्याची माहिती दिली.

पोलिसांनी टँकरची तपासणी केली असता त्यामध्ये प्रिमिक्स नावाच्या द्रव्य पदार्थाचा वापर करून बायोडिझेलची अवैध वाहतूक सुरू असल्याची बाब उघडकीस आली. कागदपत्रांवरून या टँकरमधील द्रव्य पदार्थ हा खामगाव येथील १२२ या औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतून, नरेंद्रसिंग कर्तारसिंग भाटिया यांच्या हरियाणा पंजाब रोडलाईन्स या नावाने वाहतूक होत असल्याचे दिसून आले.प्रत्यक्षात या पत्त्यावर बाबा ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवून बनावट बिल व टॅक्स इनव्हॉइस तयार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. हा द्रव्य ज्वलनशील असल्याची जाणीव असतानाही त्याची असुरक्षितपणे वाहतूक करत असल्याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देवराज ट्रान्सपोर्टचे संचालक विजयभाई सोलंकी, प्रीमा केमिकलचे संचालक, असलम शेख, बाबा ट्रेडिंगचे मालक तसेच टँकर चालक इंद्रसेनसिंग, दिग्विजयसिंग यांच्या विरोधात भादवि कलम 420, 285, 188, 465, 468, 470, 471, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथकाने टँकरसह 22 लाख 99 हजार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments