*धुळे* व नंदुरबार शहरात आणि अक्कलकुवा येथे आयकर विभागाने ठिकठिकाणी सर्च अर्थात छापेमारी केल्याने संपूर्ण खान्देशात खळबळ माजली आहे . दोन दिवस व त्यापेक्षा अधिक दिवस हे छापेमारीचे व त्या नंतरचे कामकाज चालणार आहे . धुळ्यात भदाणे , देशमुख , वाघ अशा चौघां बड्या ठेकेदारांवर ही कारवाई झाली आहे . नंदुरबार मध्ये यापेक्षा अधिक ठिकाणावर मुंबई , औरंगाबादच्या पथकांनी छापेमारी केली आहे . संपूर्ण देशातच आता आयकर , इडी , सीबीआय , एनसीबी यांच्या कारवायां कडे राजकीय दृष्टिकोणातून बघितले जावू लागले आहे . या संदर्भात होणार्या टीकेवरून सोशल मीडियात खूप मीम्स प्रसिद्ध होतात . एका कारमधील छापा कारवाईस निघालेला अधिकारी आपल्या ड्रायव्हरला महणतो , की ' अरे बाबा गाडी अजुन वेगाने पळव , अन्यथा आपण छापा टाकण्यास पोहोचण्याच्या आधिच त्यांचा भाजपा प्रवेश झालेला असेल ! ' यातील विनोदाचा भाग वगळला तरी देशभरात हेच वातावरण आहे , ही बाब मान्य करावी लागेल . आता उत्तर प्रदेशात अनेक सपा नेत्यांच्या घरावर आयटीचे छापे पडले . शेकडो कोटींचे व्यवहार सापडले . कानपूरला एका अत्तर व शिखर पानमसाला विक्रेत्याकडे तब्बल १६० कोटीची कॅश सपडली . नोटा मोजायला सहा मशिन लागले . अजून नोटा सापडतच आहे . यावर सपा नेते सिंह म्हणाले गुजरात मध्ये विमल दिलबाग वगैरे वगैरे किती तरी पानमसाला उत्पादक आहेत . त्यांच्या घरात अब्जो रुपये कॅश पडली आहे . तेथे कां कारवाई होत नाही ? खरे म्हणजे केंद्राच्या या संस्थांनी देशातील सर्वच गुटखा , पानमसाला , तंबाखूजन्य पदार्थ उत्पादकांवर छापे टाकले पाहिजेत. मुळात गुटखा , पानमसाला सारख्या जीवघेण्या वस्तुंच्या उत्पादनास सरकार परवानगीच कशी काय देते ? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे . छापा भाजपावाल्यांकडे पडत नाही म्हणून स पा वाल्यांकडेही पडू नये ! अशी मागणी करण्यामागचे तर्कशास्र मात्र समजण्याच्या पलिकडचे आहे . भाजपा असो, की कोणत्याही पक्षाशी संबंधित असो . आयकर बुडविल्याची प्रथमदर्शनी माहिती आली . ती व्हेरिफाय होत असेल तर कारवाई झालीच पाहिजे . एवढी एकशे साठ कोटी रुपये बेहिशोबी कॅश घरात दडविणार्यांचे समर्थन कुणी कसे काय करू शकेल? भाजपा वाल्यांच्या घरातही अशी कॅश असल्याचे इनपुट मिळाल्यावर तेथेही कारवाई झाली पाहिजे .
महाराष्ट्रात चाळीस आय ए एस , आयपीएस अधिकाऱ्यांना आयकर विभागाने नोटीसा बजावल्या आहेत . नगरविकास , सार्वजनिक बांधकाम , पोलिस व विविध खात्यातील हे अधिकारी आहेत . यांनी नजरेस भरेल अशी काळी माया भ्रष्ट्र मार्गाने कमावल्याचा संशय आहे . वास्तविक आय ए एस , आयपीएस , आय एफ एस , आय आर एस वगैरे सनदी अधिकारी यांचे सर्व्हिस स्ट्रक्चर त्यांना भ्रष्ट्राचार करण्याची गरज पड्र नये व त्यांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये . असे बनविलेले असते . गेली काही वर्षे यास अनुसरूनच अनेक बड्या बड्या अधिकार्यांनी प्रामाणिक सेवा बजावत आपले नाव कमावले आहे . ते अधिकारी देशाची शान राहिले आहेत . मात्र अलिकडे प्रशासन यंत्रणेत व राजकीय नेतृत्वात थैमान घालणारा भ्रष्ट्राचाराचा न्हायरस आता सनदी अधिकार्या नाही बाधित करीत आहे . त्यामुळे परमबीर सिंग , समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांवर प्रचंड मोठमोठे आरोप होतात. सामान्य माणसांनी , व्हिसल ब्लोअर , आरटीआय कार्यकर्ते यांनी कितीही तक्रारी केल्या , कितीही पुरावे दिले , कितीही पाठपुरावा केला तरी कारवाई कां होत नाही ? या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे सनदी अधिकारीही भ्रष्ट्र होण्यामागे दडलेले आहे . कारण शेवटी खालच्या भ्रष्ट्रांवर कारवाई त्यांच्याच आदेशाने होत असते . आता कुंपणच शेत खाउ लागले म्हटल्यावर जनतेने जावे कुठे? सामान्य जनतेचा आज असा समज आहे , की देशात सर्वात जास्त काळा पैसा हा राजकारण्यांकडे आहे व त्यापेक्षाही अधिक काळा पैसा हा सनदी अधिकारी व इतर बडे अधिकारी यांच्याकडे आहे . हे खरे असावे असे बऱ्याचदा वाटते . मुंबई - पुण्यातले बार , पब , फाईव्ह स्टार हॉटेल्स , डिस्को व जेथे नोटा कचऱ्या सारख्या उडविल्या जातात तेथे जमणार्या तरुणाईत याच बड्या अधिकाऱ्यांच्या पोरांचा भरणा अधिक असतो . शेअर्स , रिअल इस्टेट , सोने , डायमंड , प्लॅटिनम मध्ये प्रचंड गुंतवणूक कुणाची होते ? कुठून येतो हा प्रचंड पैसा ? देशभरातले असे भ्रष्ट्र सारेच बडे अधिकारी एकदा आयटी वाल्यांनी धुवून काढले पाहिजेत . चीन पाकिस्तान ला दोन - तीन वेळा रडवून सोडता येईल, इतकी युद्ध सामुग्री तेवढ्या पैशात आपण खरेदी करू शकतो. इतका पैसा आज या विविध खात्यातल्या बड्या बाबूंच्या घरात पडला आहे . चाळीस आय ए एस , आय पी एस आज इन्कम टॅक्स च्या रडारवर आहेत . उरलेले बहुतेक सर्वही आले पाहिजेत . धुळे नंदुरबारचे ठेकेदार व अन्य आयटीच्या कारवाईत आले आहेत . या मोहिमेकडेही राजकीय चश्म्यातून बघितले जात आहे . तसे असेल किंवा नसेलही ! तो अधिक चौकशीचा भाग आहे . धुळ्यात यातील एका ठेकेदाराने इंदोरच्या महाबड्या ठेकेदाराचे काम पळविले होते . तेव्हा पासून कुरबुर सुरु होती . असेही एक कारण सांगितले जाते . ही बाब खरी आहे , की धुळ्यात या चौकडीने जी भराव प्रमुख असणारी मोठमोठी कामे घेतली होती . त्यात प्रचंड मार्जिन होते . गौण खनिज रॉयल्टीत गडबड असणाऱ्या व जागच्या जागी गौण खनिज , माती, मुरूम , नदीपात्रातील वाळू माती , भरावाच्या या कामात तुफान मार्जिन असताना , त्याचा व इतर बड्या कामांचा तेवढा आयकर त्यांनी भरला काय ? हा प्रश्नही मग उपस्थित होतो . या छाप्यांना कदाचित राजकीय रंग असेलही किंवा नसेलही . पण ज्या वेगाने या ठेकेदारी गाड्या धावत होत्या त्या मुळेच ही कारवाई इन्व्हाईट झाली असावी , असेही मानण्यास जागा आहे .
*दै.पथदर्शी, साभार
0 Comments