महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी आधिवनेशनाच्या तिसर्या दिवशी शेतकरी आत्महत्या या विषयावर तारांकित प्रश्नाव्दारे आ. कुणाल पाटील यांनी विविध मागण्या पटलावर ठेवल्या आणि शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर वाचा फोडली. शेतकर्यांचे प्रश्न मांडताना कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तसेच तेलंगणा राज्यात शेतकर्यांना खते, बि-बियाणे घेण्यासाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत केली जाते. त्या आधारावर महाराष्ट्रात योजना राबविली जावी. शेतकर्यांना कर्जमाफीबरोबर नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना अनुदान देण्याचे जाहिर करण्यात आले होते, मात्र, ते अनुदान अद्यापही शेतकर्यांना मिळाले नाही, म्हणून नियमित कर्जफेडणार्या शेतकर्यांना ५० हजार देण्यात यावे अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली.
यावेळी पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मदत आणि पुर्नवसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, तेलंगणा राज्यातील शेतकर्यांना दिल्या जाणार्या प्रतिहेक्टरी १० हजार रुपये मदतीप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत देण्याबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकित चर्चा झाली आहे. याबाबत अहवाल तयार करुन पडताळणी करण्यात येईल.
तर कोरोनाच्या संकटामुळे राज्य आर्थिक संकटात असल्याने नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान देऊ शकलो नाही. मात्र, याबाबत नक्कीच निर्णय घेतला जाईल असे ठोस आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले आहे.

0 Comments