धुळे शहरातील साक्री रोडवरील सिंचन भवन मागील लक्ष्मीनारायण मंदिरालगत सप्तश्रृंगी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोबाईल टॉवर जवळ लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील भाविकांच्या विनंतीवरून मंदिराजवळ पाण्याचा नळ असावा म्हणून नळ जोडणीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. सदरचे सेवाभावी काम एका नगरसेविकेच्या मुलाच्या प्रयत्नातून करण्यात आले होते असे समजते. नळाचे पाईपही रस्त्यावरील मुळ जलवाहिनीला जोडून पाईप मंदीराच्या कंपौंडमध्ये नेण्यात आले होते. परंतु अज्ञात व्यक्तींनी त्या पाईपाची त्याच रात्री ‘भंगार भावात’ मोडतोड करून नगरसेविका पुत्र आणि भाविकांच्या प्रयत्नांवर ‘पाणी’ फिरविले आणि नाराज भाविकांचे तोंड ‘कोरडं’च राहिले. या घटनेला महिना होत आला. परंतु या रस्त्यावर मध्यभागी पाच फुट लांब, दोन फुट रुंद, एक फुट खोल खड्डा अद्यापही आपले अस्तित्व टिकवून आहे. खड्ड्याच्या सभोवताली कुठलाही ‘संरक्षक’ बावटा लावलेला नाही. त्यातच खड्ड्याच्या विरुद्ध बाजुला अवजड वाहनांनी उद्धवस्त केलेली गटार आणि रस्ता त्यामुळे वाटसरु दूचाकी वाहन धारकांची तारांबळ उडते. काही दूचाकी धारक गाडी घसरुन जायबंदीही झाले आहेत आणि रात्री आपल्याच मस्तीत आणि धूंदीत चालणाऱ्या दोन-चार वाटसरुंची येथे झालेली अवस्था न सांगितलेलीच बरी. या बेवारस खड्ड्याची तक्रार करायची तरी कुणाकडे? आणि तक्रार करूनही, एैकतं तरी कोण? आणि ज्यांना सांगायचे ते विद्यमान आणि भावी यांच्यासाठी निवडणूक अजून दोन वर्ष म्हणजे तब्बल सातशे तीस दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मतदार राजा सहन करीत रहाणेच आपणा सर्वांच्या नशिबी आहे. ‘आपले शहर, सुंदर शहर’ हे ब्रिद थोडे तरी दिसू द्या हो, पालिकेच्या अधिकारी-कारभाऱ्यांनो ! असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी केले आहे.
- गो. पि. लांडगे,
ज्येष्ठ पत्रकार, धुळे.
मो. 94227 95910

0 Comments