Header Ads Widget

चांदवडमध्ये शिकाऊ ग्रामसेवक सोनसाखळी चोर, चोरट्याला अटक



नाशिक - पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चांदवड तालुक्यातील शिकावू ग्रामसेवकच सोनसाखळी चोर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलीस मित्राने दिलेल्या माहितीवरून गंगापूर पोलिसांनी या चोरट्याला अटक केली.

त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे ५ लाखांचे ११ तोळे सोने व दुचाकी जप्त केली. विपूल रमेश पाटील (रा. अमृतधाम, नाशिक, मूळ रा. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

विपूल पाटील याने कोरोनाकाळात १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तो चांदवडमध्ये शिकाऊ ग्रामसेवक म्हणून नोकरी करतो. अमृतधाम भागात राहणारा विपूल रविवारी आणि सुटीच्या दिवशी नाशिक शहरात महिल्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवून लंपास करायचा. सोनसाखळी चोरीप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी पोलीस मित्रांना संशयित चोरट्याच्या वर्णनाचे सीसीटीव्ही फुटेज व माहिती पाठवली होती. त्याआधारे बुधवारी (दि.१५) एका पोलीस मित्राला संशयित चोरटा गंगापूर पोलीस हद्दीतील सावरकर नगरात फिरताना दिसला. शिवाय, त्याच्याकडे असलेल्या बाईकला नंबरप्लेटही नव्हती. पोलीस मित्राने ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि संशयिताला आकाशवाणी टॉवर परिसरात अटक केली. त्याने गंगापूर पोलीस हद्दीत पाच सोनसाखळी चोऱ्या केल्याची कबुली दिली.

एका पोलीस मित्राने संशयित चोरटा दिसताच पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे गंगापूर पोलिसांना चोरट्याच्या मुसक्या आवळता आल्या. नागरिकांनीसुद्धा संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांशी संपर्क साधावा. - अमोल तांबे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

Post a Comment

0 Comments