शिरपूर (धुळे) : घराचे वीजबिल वाढल्याचा राग आल्याने वायरमनला वीजग्राहकाने बेदम मारहाण केली.
आनंदा रमेश बिलाडे (वय ३४, रा. भवानी टेक, शिरपूर) असे जखमी वायरमनचे नाव आहे. शिंगावे शिवारातील बुधेलालनगरमधील सुधाकर वाल्हे यांच्याकडे मीटर बदलण्याचे काम करून मदतनीस दिवाण पावरा व युवराज सोनवणे यांच्यासोबत वीज कंपनीच्या कार्यालयाकडे जात होते. या दरम्यान संशयित मनोज तुळशीराम मराठे (रा. लक्ष्मीविहार कॉलनी, शिरपूर) याने त्याची दुचाकी रोखली. 'माझे वीजबिल वाढून आले आहे, तुम्ही काहीही बिल पाठवितात', असे सांगून त्याने शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातातील लोखंडी कड्याने बिलाडे याच्या बोटाचे नख उपटून जखमी केले.
पोलिसात गुन्हा दाखल
वायरमनला रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वायरमन बिलाडे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments