*धुळे,* जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात व राज्यभरातच परिक्षा मंडळाचे निलंबित आयुक्त तुकाराम तुपे व चौकडीचे भरपूर एजंट आहेत. तुपेच मध्ये गेल्याने व तपासी यंत्रणेने कारवाईचा व्याप वाढविल्याने या एजंटांचेही आता लाईट लागले आहेत. यातले काही भुमिगत झाले आहेत . काहींनी मोबाईल बंद केले . काहींनी सीम बदलले आहेत . ज्यांच्या कडून या एजंटांनी अॅडव्हान्स घेवून ठेवला आहे . त्यांना आता काम होणार नाही याची खात्री पटल्याने, त्यांनी रकमा परतीसाठी तगादे सुरु केले आहेत . हा घोटाळा व अन्य सारे परिक्षांचे घोटाळे २०१७ पासून सुरु होते. त्यामुळे ज्यांचे यात काम झाले आहे व ज्यांनी पैसे देवून कामे करून घेतली आहेत असे शेकडो उमेदवार आहेत . या सर्व मुन्नाभाईंचीही नोकरी धोक्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यांचेही तगादे या एजंटांकडे सुर होणार आहेत . टीईटी , म्हाडा , आरोग्य भरती, एमपीएससी , पोलिस या सार्याच भरती आता चौकशी व कारवाईच्या रडारवर आहेत . दुसरीकडे ज्या ज्या उमेदवारांनी खूप अभ्यास केला , मेहनत घेतली , प्रामाणिकपणे परिक्षा दिली . त्यांचा नंबर न लागता . कोरे पेपर ठेवून, अठ्ठ्याणव गुण मिळवून नोकरी मिळविणारे मुन्नाभाई उघडे पडल्यावर त्यांचा संताप होणे साहजिकच आहे . अशा सर्व फ्रॉड मुन्नाभाईंना ताबडतोब मुक्त करावे व नव्याने परीक्षा घ्याव्या. अशी मागणी आता तरुणांमधून जोर धरू लागली आहे. तार्किक दृष्ट्या व नियमाने ते बरोबर आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक, तहसिलदार, वगैरे वगैरे अनेक शासकीय पदांवर हे बनावट पात्रता धारण करणारे महाभाग अजुनही काम करीत आहेत . ही वाईट बाब आहे . बनावट टीईटी पात्रता धारण करणारे हजारो शिक्षक आहेत . त्या सर्वांना आता तातडीने घरी पाठविणे गरजेचे झाले आहे . या व इतर सर्व कामकाजाबाबत एकूणच शिक्षण विभाग पार पोखरला गेला आहे . ही घाण आजची नाही . अनेक वर्षांपासून वाढत वाढत गेली आहे . त्याचे छोटे मोठे स्फोट नेहमीच होत रहीले पण आता तुपे वगैरेंच्या निमिताने महास्फोट झाला आहे . यास मागची दोन तीन सरकारे जबाबदार आहेत . शिक्षण विभागास स्व . मधुकरराव चौधरी , आ . अमरिशभाई पटेल सारखे बोटावर मोजण्या इतकेच प्रामाणिक शिक्षणमंत्री मिळाले असावेत . या निमित्ताने विद्यमान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा धुळ्यातून 'आप' ने मागणी केला आहे . खरे म्हणजे एवढा मोठा स्फोट झाल्यावर शिक्षण मंत्र्यांनी केव्हाच राजीनामा देवून मोकळे व्हायला हवे होते . शिक्षणमंत्री कां खूर्चीला चिटकून बसले आहेत ? या स्फोटाची धग शिक्षण मंत्रालयापर्यंत जाणार आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी . शिक्षण खात्यातील महत्त्वाच्या पोस्टिंग मधले 'व्यवहार ' या निमित्त बाहेर येवू शकतात . हे नव्याने सांगण्याची गरज नसावी . या सरकारच्या काळातील, मागील व त्याच्या मागील सरकारच्या काळातील अशा प्रकरणांचे या निमिताने एसआय टी लावून पोस्टमार्टेम होणे आवश्यक ठरते . शिक्षण विभाग पवित्र कामासाठी आहे. मात्र सर्वाधिक घाण या विभागातच आहे . प्रत्येक गोष्टीचे येथे रेट आहेत . सर्रास बनावट कागदपत्रे, बनावट विद्यार्थी संख्या , बनावट मान्यता , बनावट आदेश , बनावट रजिस्टर , बनावट जावक नंबर , बनावट सह्या , प्रत्येक कामाचे पैसे . नुसतीच लुटीची किड वर्षानुवर्ष सुरु आहे . हे सर्व उद्योग मात्र गावोगावच्या शिक्षण क्षेत्रातले एजंटांचे नेटवर्कच पार पाडत आहेत . अशा गैर प्रकारांच्या विरोधात आवाज उठवून शिक्षण विभागाची साफसफाई ठेवण्याचे ज्यांचे प्रथम कर्तव्य आहे , त्या शिक्षक - शिक्षकेत्तर संघटनां मधीलच काही कार्यकर्ते यांचे एजंट बनले आहेत . काही मुख्याध्यापक , काही हेडक्लर्क , संस्था चालक व इतर मंडळी एजंट म्हणजे ' दल्लाल ' झालेले आहेत. शिक्षण खात्यातील व्यापक खुल्या घाणीबाबत माध्यमे इतर कार्यकर्ते आवाज उठवितांना दिसतात पण वरील या जबाबदार मंडळींनी सार्वत्रिक पणे आवाज उठविल्याचे कधी कुणी पाहिले आहे काय ? शिक्षण क्षेत्रात त्या क्षेत्रातीलच दल्लालांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे . तुपे असो , की या गँगचे विविध उपसंचालक , शिक्षणाधिकारी व अन्य अधिकारी, भाउसाहेब असोत सर्व मिळून तूफानी लुटमार वर्षानुवर्ष करीतच आहेत . शिक्षण विभागात या प्रकारची कोट्यवधिंच्या लुटमारीची सततची बिर्याणीची दावत असली, की त्यात हड्डींचा का असेना, आपला वाटा वसूल करण्यासाठी तेथे कुत्र्यांच्या झुंडीच्या - झुंडी , लोंढेच्या - लोंढे गोळा होणे साहजिकच असते . त्याच प्रकारे शिक्षण विभागाच्या या घाणित चरण्यासाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी तोडेपिरांचाही एक नवा वर्ग सर्वत्र तयार झाला आहे. खात्यात होणाऱ्या बोगस कामांची माहिती विविध नावाने गोळा करून , तक्रारी करून मोठ मोठ्या तोड्या करणाऱ्यांचाही एक नवा आनंददायी उद्योग जन्मास आला आहे. अर्थात काही प्रामाणिक तक्रारदार व्हिसल ब्लोअरही असतात. पण धंदेवाईक तोडेपीर कमाईत अधिक आनंद मानतात. आता राज्यभरातच शिक्षण विभागाच्या मागील दहा पंधरा वर्षांच्या एकूणच कामाची चौकशी आवश्यक झाली आहे . एसआयटी व कदाचित सीबीआय देखील येईल . मंत्रालयापासून, तुपे - डेरे वगैरे वगैरे पासून, गावोगावचे कलेक्शन एजंट उघड झाले पाहिजेत . वरीष्ठ अधिकाऱ्या पासून , भाउसाहेब पासून तर थेट या भ्रष्टाचाराच्याच पैशांचे लाभार्थी असणारे तोडेपीर , याच गुन्ह्यातील रकमांवर सर्वत्र पोसले जाणारे बांडगुळ व तोडेपीरांचे लोंढेच्या लोंढे समोर आले पाहिजेत. कारण यांनीही हडपलेला पैसा हा यातील भ्रष्टाचाराचाच आहे . त्यामुळे येथपर्यंत या एसआयटी किंवा सीबीआय चौकशीची कार्यकक्षा वाढू शकते . शिक्षण क्षेत्रातील घाण मुळापासून उखडून फेकावयाची असेल तर इतक्या खोलपर्यंत जावे लागेल .
0 Comments