Header Ads Widget

न्या. जे.टी. देसले यांना दिला गेलेला डॉ. कमलताई मराठे पुरस्कार हा ट्रस्टला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा आहे- प्राचार्य बी.एस. पाटील



कासारे (साक्री)-  सेवाभाव व त्याग ही दोन राष्ट्रीय मूल्ये अंगीकारत समाजाला केन्द्रस्थानी ठेऊन  आपल्या कार्य कर्तुत्वाचे ज्यानी वर्तुळ काढले ते माजी न्यायमूर्ती बापूसाहेब ॲड. जे.टी.देसले  यांना मातोश्री वेणूताई बेडसे ट्रस्टच्या वतीने दिला गेलेला ‘डॉ.कमलाताई मराठे पुरस्कार’  हा  ट्रस्टला प्रतिष्ठा  प्राप्त करुन देणारा व ट्रस्टची उंची वाढविणारा  असल्याचे प्रतिपादन प्राचार्य दादासाहेब बी. एस. पाटील यानी केले. मातोश्री वेणूताई बेडसे, शांताई प्रतिष्ठान  व साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री  तर्फे दरवर्षी  दिल्या जाणाऱ्या  डॉ.कमलाताई मराठे पुरस्कार, यंदा कासाऱ्याचे भूमिपुत्र ॲड. जे.टी देसले यांना काल दिला गेला. या पुरस्कार प्रदान  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब बी. एस. पाटील बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कासारे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमाकांतदादा देसले, ट्रस्टचे अध्यक्ष रणजित ठाकरे, उपाध्यक्ष कॉ.सुभाषदादा काकुस्ते, सर्व संचालक, उत्तमराव देसले, शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, पी.डी.देवरे, शशिभुषण देसले, संजय देसले आदि  संचालक मंडळ, कासाऱ्याचे सरपंच विशाल देसले , त्र्यंबक भामरे, दिलीप काकुस्ते, डॉ.दिलीप चोरडीया, सुरेशभाऊ पारख, प्राचार्य पी.एस. सोनवणे, जगदीश वाघ, ए.पी.दशपूते, आदी मान्यवर उपस्थित होते.

पू. साने गुरुजी, कै .जे.यु. नाना ठाकरे, वेणूताई बेडसे, डॉ.कमलाताई मराठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य बी.एस. दादा पाटील पुढे म्हणाले की, समाजभान ठेवून काम करणाऱ्या  जे.टी. देसले यांना दिला गेलेला हा पुरस्कार सामाजिक पुरस्कार असून तो प्रेरणा देणारा आहे असे नमुद करत कासाऱ्याच्या माहेरवाशीन  वेणूताई व अप्पा साहेब बेडसे यांच्या कार्याचा त्यानी गौरव करत नानासाहेबांनी सुरु  केलेल्या या उपक्रमांची प्रशंसा केली.व या बरोबरच अन्य गुणवंताचा संस्थे तर्फे सत्कार करून त्यांना बळ देण्याचा उद्देश स्पष्ट  केला.

     या प्रसंगी ॲड. जे.टी.देसले यांच्या हस्ते  प्राचार्य बी.एम.भामरे व विलास देसले यांनी  संपादित केलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरात उत्तमराव देसले, प्राचार्य व्ही.के.भदाणे, दिलीप काकुस्ते, सत्कारमूर्ती ॲड. गिरिशा देवरे, व बापूंची नात लतिका देसले यांनीही मनोगते व्यक्त केलीत.

या प्रसंगी शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे पं.स.सदस्या मंगला विजय  भामरें व माधुरी चन्द्रकांत दसले , गुलाबराव काकुस्ते, ॲड. गिरीशा देवरे, ॲड. जागृती देवरे, डॉ.दिलीप चोरडीया,  विलास देसले, प्राचार्य बी.एम. भामरे, यांचा विशेष यश व योगदाना बद्दल  सत्कार करण्यात आला. तसेच अंनिस, ग्राहक पंचायत, प्रवासी महासंघ व निसर्ग मित्र समिती तर्फे सुरेश पारख यांनी न्या. जे.टी.दसले, प्राचार्य बी.एस पाटील यांचा सत्कार केला.

आपल्या सत्काराला उत्तर देताना न्या. ॲड. जे.टी देसले म्हणाले की, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत असताना हा ट्रस्ट  उदात्त हेतूने स्थापन करणाऱ्या  कै. नानासाहेब जे. यु. ठाकरे यांच्या उपस्थितीत घेता आला नाही याची खंत असल्याच्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. प्रारंभी मुम्बई येथे रामराव आदिकांबरोबर वकीली करताना त्यांचा मुंबईत राहण्याचा आग्रह झुगारुन, मायभूमीच्या ओढापायी धुळ्याला वकीली सुरु करून कुटुंबाकडे लक्ष देत, राजकारण व समाजकारणही करता आल्याचे सांगितले. आपल्या वकीली व्यवसायात व न्यायाधीशपदाच्या कार्यकाळात कुणाचेही आर्थिक शोषण केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आयुष्यभर अंधश्रद्धेला कधीच बळी पडलो नसल्याचे सांगून आजही 80 व्या वर्षी सामाजिक  बांधिलकी ठेऊन विविध पदावर  काम करत असल्याचे समाधान व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी मिळालेल्या पुरस्काराचा 10 हजाराचा धनादेश व आपले वरुन 5 हजार टाकत  ट्रस्टला परत केलेत.

कॉ.सुभाष काकुस्ते यानी प्रास्ताविक केलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व मान्यवर परिचय एम.टी ठाकरे, जे.सी.बोरसे, लाला मोरे  व बी.डी. तोरवणे यांनी केले, तर मानपत्राचे  वाचन व वेणूताईंचा परिचय मंजूश्री  ठाकरे यांनी केला. मुख्याध्यापक के.डी. सोनवणे यांच्या आभार प्रदर्शन व रवी खैरनार यांच्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनाची नियमावली पाळत संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कासाऱ्याच्या  बहुउद्देशीय माध्यमिक विद्यायाच्या स्टाफने व  ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 


Post a Comment

0 Comments